ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातून दिवा- सीएसएमटी उपनगरीय रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी रविवारी दुपारी दिव्यातील नागरिकांनी रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दिव्यातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाच्या कालावधीत दिवा स्थानक परिसरात वाहतुक कोंडी झाली होती.

दिवा शहरात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या नागरिकामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. दिवा रेल्वे स्थानकात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईत प्रवास करण्यासाठी येथील रहिवाशांना रस्ते वाहतुकीचा चांगला पर्याय नसल्याने दिवा रेल्वे स्थानकावर वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथील रेल्वे अपघातामध्ये रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

दिवा रेल्वे स्थानकात जलद रेल्वेगाड्यांना थांबा आहे. परंतु यातील बहुतांश रेल्वेगाड्या कर्जत, कसारा भागातून सुटणाऱ्या आहेत. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांनी भरून येत असल्याने दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या वेळेत या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही. तसेच धिम्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग उद्भवतात. दिवा-सीएसएमटी रेल्वेगाडी सुरु करण्यात यावी या मागणीसाठी दिव्यात अनेक आंदोलने झाली. दररोज प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादातून दिव्यातील नागरिकांनी अनेकदा रेल्वे रुळांवर उतरुन आंदोलनही केले होते.

पुन्हा याच मागणीसाठी रविवारी दिव्यातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिवा शहरात पायी मोर्चा काढला. त्यानंतर आंदोलक रेल्वे स्थानकात पोहचले. दिवा रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन होणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) प्रशासनाचा फौजफाटा रेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वे रुळांजवळ तैनात करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रविवारी दुपारी १२ वाजता रेल्वे प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत दिवेकरांनी आंदोलन केले. तसेच सर्व जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांना दिव्यात थांबा देण्यात यावा, दिवा-पनवेल रेल्वेसेवा सुरु करावी या देखील मागण्या करण्यात आल्या. भर पावसात येथील रहिवासी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देत होते. आंदोलनामध्ये महिलांनी देखील मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. आंदोलनाच्या कालावधीत दिवा रेल्वे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. दिवा रेल्वे फाटक, स्थानक परिसरात रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या.