कल्याण – दिवाळीनिमित्त खरेदीदार नागरिकांची वाहने अधिक प्रमाणात शुक्रवारी बाहेर पडली. ही वाहने मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातून पूर्व आणि पश्चिम भागातून येजा करत असताना दिवा रेल्वे फाटकातील कोंडीत अडकली. रेल्वे फाटकातील वाहनांची संख्या कमी होत नसल्याने शुक्रवारी दुपारी कल्याणकडून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे येणाऱ्या लोकल वीस ते पंचविस मिनिटे दिवा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला जागोजागी खोळंबल्या.
यामुळे दिवा रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा मुंब्रा आणि कोपर दिशेने लोकलच्या एकापाठोपाठ रांगा लागल्या होत्या. दिवाळीसाठी नागरिक अधिक प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक नागरिक खरेदीसाठी कुटुंबीयांसह मुंबईला जातात. या खरेदीदारांना या खोळंब्याचा फटका बसला.
दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजुला रस्त्यावर दिवाळी सणाच्या काळात फटाके दुकाने, दिवाळी फराळ आणि इतर वस्तू विक्रीची दुकाने रस्ते अडून उभारली जातात. त्यात या रेल्वे स्थानकाच्या बाजुला मासळी बाजार भरतो. बाजुलाच रिक्षा वाहनतळ आहे. मुंब्रा, ठाणे दिशेने येणारी डोंबिवलीकडे जाणारी बहुतांशी वाहने दिवा पूर्व रेल्वे स्थानक भागातून धावतात. दिवाळी निमित्त भरलेल्या बाजारात आणि येथील रस्त्यावर कोंडी झाली की त्याचा फटका दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकातून पूर्व, पश्चिम जाणाऱ्या वाहनांना बसतो. दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात हा प्रकार घडतो.
शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान दिवा पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर बाजार भरला होता. बाजारातून अनेक वाहने दिवा पश्चिम आणि काही वाहने पूर्व भागात येत होती. परंतु, बाजारातील गर्दीत अनेक वाहने जागाजोगी अडकून पडली होती. काही अवजड वाहने या कोंडीत होती. अनेक वाहनांना वळसा घेण्यास रस्ता नव्हता. या भागात वाहतूक पोलीस नसल्याने मनमानी पध्दतीने दुचाकी, मोटार कार चालक पुढे जाण्याच्या प्रयत्नात कोंडी करून बसले होते.
दुपारी रेल्वे फाटक उघडताच एकाचवेळी वाहने फाटकातून दिवा पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे फाटकातून जाऊ लागली. फाटक बंद होण्यापूर्वी आपला फाटक छेदून पुढे जावे या प्रयत्नात प्रत्येक वाहन चालक होता. या चढाओढीत रेल्वे फाटकात तुफान वाहन कोंडी झाली. संथगतीने रेल्वे फाटकातून वाहने पुढे जाऊ लागली. रेल्वे फाटकाचा नियंत्रक आणि या भागात रेल्वे कमांडो या कोंडीतून वाहने झटपट पुढे जावीत यासाठी प्रयत्न करत होते.
फाटक बंद होण्याची वेळ आली तरी अनेक वाहने रेल्वे फाटकाच्या मध्यभागी होती. त्यामुळे रेल्वे फाटक नियंत्रकाला रेल्वे फाटकातील वाहनांची वर्दळ कमी होत नाही तोपर्यंत रेल्वे फाटक उघडे ठेवावे लागले. फाटक बंद न झाल्याने दिवा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला लोकलच्या रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना अचानक लोकल का खोळंबल्या, असा प्रश्न पडला. ऑक्टोबर हिटचा चटका, घामाने चिंब झालेले अंग, कपडे, लोकलमधील गर्दी त्यामुळे प्रवासी त्रागा करत होते. रेल्वे फाटक बंद झाल्यावर वीस ते पंचविस मिनिटांनी लोकल धाऊ लागल्या.