बदलापूर, ठाणे – ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवाळीच्या उत्साहावर पावसाने पाणी फेरले. बदलापुरात ढगफुटी सदृश पाऊस पडला. अवघ्या एक तासात 101.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
या अवकाळी पावसामुळे नागरिकांचा उत्साह ओसरला, दारातील रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे आणि कांदिलांचे नुकसान झाले. बाजारात असलेल्या नागरिकांची, दुकानदारांची तारांबळ उडाली. तर कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, बदलापूर शहरात मंगळवारी सायंकाळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच पाऊस पडल्याने दुकानदार किंवा नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळपासून जिल्ह्यात उत्सवी वातावरण होते. मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच विजांचा कडकडाट, गार वाऱ्याच्या झुळका आणि अवकाळी पावसाने अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले.
ठाणे, नवी मुंबई शहरात वारा आणि पाऊस सुरु झाल्याने कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदार, प्रवाशांना फटका बसला. बदलापूरसह आसपासच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचले, बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
बदलापुरात ढगफुटी सदृश पाऊस पडला. अवघ्या एक तासात 101.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक जणांना सामान घेऊन आसरा शोधावा लागला. रांगोळ्या, किल्ले, कंदील आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मुलांचाही हिरमोड झाला. अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मुलांनी सुट्ट्या लागल्यापासून किल्ले उभारणीचे काम केले. मात्र त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने मुलांची सर्व मेहनत पाण्यात गेली. अनेकांनी तातडीने किल्ले झाकले. मात्र तोपर्यंत पावसाने किल्ले साफ धुतले होते. पावसामुळे बदलापूर येथील काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.