डोंबिवली : डोंबिवली, कल्याणजवळील २७ गावांचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र महापालिका करण्यात यावी. या महापालिकेसाठी आपण शासनस्तरावर पूर्ण ताकदीने पाठपुरावा करू. शासनाने ही मागणी मान्य केली नाहीतर कल्याण डोंबिवली परिसरातील तीन लाख आगरी, कोळी समाजाचा विराट मोर्चा मंत्रालयावर नेण्यात येईल, असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी रविवारी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या येथील होरायझन सभागृह येथे झालेल्या सभेत दिला.
आपल्या कामकाज पध्दतीत अशक्य शब्द नाही. त्यामुळे २७ गावची स्वतंत्र महापालिका झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन खासदार म्हात्रे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी माजी आमदार राजू पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, काँग्रेस नेते संतोष केणे, अर्जुनबुवा पाटील, माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ गाव ग्रामस्थांना स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वासन दिले होते. दहा वर्षाच्या कालावधीत स्वतंत्र नगरपालिकेसाठी भाजप, शिंदे शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने संघर्ष समितीमधील एका गटाने खासदार म्हात्रे यांना संपर्क करून २७ गावच्या स्वतंत्र महापालिकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
२७ गावच्या अस्तित्व, विकासासाठी आपण ४३ वर्ष संघर्ष करत आहात. विकासाच्या टप्प्यातील या परिसराच्या नागरी समस्या मार्गी लागल्या पाहिजेत. विकास कामे झाली पाहिजेत. विकासाच्या विषयावर आपण सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे. आपण २७ गावच्या महापालिकेसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. एक वर्षाच्या आत स्वतंत्र महापालिकेचा विषय मार्गी लागला पाहिजे, असे खासदार म्हात्रे यांनी मार्दर्शनपर भाषणात सांगितले.
मी राजकीय चपला बाहेर काढून सभेला आलोय. पालिका, शासनाने नेहमीच २७ गावांवर अन्याय केला. नगरपालिकेची फक्त आश्वासने दिली. हा विषय मार्गी लावायचा असेल तर मोर्चा हेच प्रभावी अस्त्र आहे, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
तत्कालीन एका पालिका आयुक्ताने एका ओळीच्या ठरावावर २७ गावे पालिकेतून वेगळी केली. या सगळ्या हालचालींना जबाबदार कोण, त्याचा विचार करा, असे सांगत मनसेचे नेते राजू पाटील यांनी शिंदे गटावर टीका केली.
पालिका निवडणुकांवर बहिष्कार
२७ गावच्या स्वतंत्र महापालिकेचा विषय सर्वाेच्च न्यायालयात प्रल्ंबित आहे. आगामी पालिका निवडणुका जाहीर झाल्यातर मागच्या इतिहासाप्रमाणे् संघर्ष समिती या निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. संघर्ष समितीने पालिका निवडणुकांमध्ये उमेदवार दिले नाहीतर मनसे या भागात एकही उमेदवार उभा करणार नाही, असे आश्वासन मनसेचे राजू पाटील यांनी दिले.