डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील पदपथाला खेटून तीन ते चार फुटाच्या लोखंडी पायऱ्या केल्या आहेत. या पायऱ्या रस्ते आणि पदपथा दरम्यान असल्याने वाहतुकीला अडथळा आणि पादचाऱ्यांना चालताना त्रास होत आहे. या लोखंडी पायऱ्यांचा आडोसा घेऊन फेरीवाले आपले ठेले, मंच लावून रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर वाहन कोंडी होत आहे.
डोंबिवली पूर्व फ प्रभाग क्षेत्र हद्दीतील बापूसाहेब फडके रस्ता हा बाजारपेठेचा रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुकानदारांनी लोखंडी जाळ्यांच्या पायऱ्या पदपथाला खेटून लावल्या आहेत. या जाळ्यांच्या बाजुला दुकानदार आपली दुचाकी वाहने उभी करून ठेवतात. या लोखंडी पायऱ्या आणि दुचाकी वाहनाच्या बाजूुला फेरीवाले मंच, ठेले लावून व्यवसाय करत आहेत.
दुकानासमोरील तीन ते चार फुटाच्या लोखंडी पायऱ्यांमुळे रस्त्याची जागा अडवली जाते. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ फडके रस्त्यावर वाहन चालकांना कसरत करावी लागते. अनेक दुकानांसमोर ग्राहकांची वाहने उभी असतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. अनेक फेरीवाल्यांनी लोखंडी डब्यामध्ये सीमेंट काँक्रीट टाकून त्यामध्ये सावलीच्या छत्र्या उभ्या करण्यासाठी ठोकळे पदपथांच्या आडोशाने ठेवले आहेत.
नेहरू रस्ता भागात असेच चित्र आहे. डोंबिवली पश्चिमेत महात्मा गांधी रस्त्यावर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सीमेंट काँक्रीटचे ठोकळे आणून ठेवले आहेत. महात्मा गांधी रस्ता रिक्षा वाहनतळ ते पु. भा. भावे सभागृह दरम्यान हे काँक्रीटचे ठोकळे दुकानांसमोर आहेत. अन्य वाहन चालकांनी त्या भागात वाहने उभी करून नयेत, असा संदेश हे दुकानदार अशा कृतीमधून नागरिकांना देत आहेत. एखाद्या ग्राहकाने, अन्य वाहन चालकाने त्या ठिकाणी वाहन उभे केले तर दुकानदार आपले दुचाकी वाहने त्या वाहनांच्या मागे उभे करून वाहनाचा हॅन्डल लाॅक करून निघून जातो. असे प्रकार महात्मा गांधी रस्त्यावर सर्रास सुरू आहेत. यावरून वादाचे प्रसंग घडत आहेत.
हे सगळे प्रकार सुरू असुनही ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी कोणतीही कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी आहेत. असेच प्रकार ह प्रभागातील महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, सुभाष रस्ता भागात दुकानदारांकडून सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक फेरीवाले, हातगाड्या, टपऱ्यांनी गजबजून गेले आहेत.
आयुक्त अभिनव गोयल यांनी एक दिवस अचानक डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा, सुभाष रस्ता, महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, मोठागाव, उमेशनगर रेतीबंदर रस्ता, देवीचापाडा गोपीनाथ चौक, नवापाडा भागात संध्याकाळच्या वेळेत अचानक दौरा करून फेरीवाले, टपरी, हातगाडी चालकांना पाठबळ देणाऱ्या ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.