Premium

ठाणे: धरणातील गाळातून शिवारांना सुपीकता

धरण आणि तलावांमधील पाणीसाठय़ात वाढ आणि शेतीत गाळाच्या साह्याने सुपीक माती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे.

Dam silt starvation 24
धरणातील गाळातून शिवारांना सुपीकता

ठाणे जिल्हा प्रशासनाचे अभियान, शहापूर, मुरबाडमध्ये महिनाभरात १०,१८० घनमीटर उपसा

ठाणे : धरण आणि तलावांमधील पाणीसाठय़ात वाढ आणि शेतीत गाळाच्या साह्याने सुपीक माती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील तलावांमधून गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जलसंधारणासाठी काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ आणि भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने जिल्हा परिषदेमार्फत हे अभियान राबविले जात आहे. याबाबतचा शासन निर्णय मार्च २०२३च्या अखेरीस जाहीर झाला. सध्या राज्यातील जलसाठय़ांत अद्याप ४४ कोटी घनमीटर गाळ शिल्लक आहे. त्यामुळे हे अभियान कायमस्वरूपी राबवले जाणार आहे. जलसाठय़ातील पाण्याचे कमी प्रमाण आणि शेतातील पिके काढण्यात आल्यानंतर हा उपक्रम राबवता येणे शक्य आहे. यासाठी फारच कमी कालावधी मिळतो. जलसंधारणासाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ व भारतीय जैन संघटनेने यात सहभाग घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ हजार रुपये अनुदान

गाळउपसा करण्यासाठी याआधी केवळ इंधन खर्च दिला जात होता. मात्र सध्या यंत्रसामग्री आणि इंधन खर्चही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गाळ वाहून नेण्यासाठी अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

७२ ठिकाणी कामाचे नियोजन

लघुपाटबंधारे विभागांतर्गत एप्रिलमध्ये झिडके, कोन, केल्हे तालुका भिवंडी, टेंभा तालुका शहापूर, कुडवली तालुका मुरबाड येथे कामाला सुरुवात झाली. भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाच तालुक्यांत पहिल्या टप्प्यात ३६ कामांची सुरुवात करण्यात आली. तर ७२ ठिकाणी मोसमीपूर्व कामांचे नियोजन असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाचे प्रमुख दिलीप जोकार यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fertilization of rivers from dam silt amy