किरकोळ बाजारात २०० ते ३५० रुपये किलोने विक्री

निखिल अहिरे
ठाणे : प्रामुख्याने नाशिकमधून येणाऱ्या काळय़ा आणि हिरव्या द्राक्षांचा हंगाम संपला असला तरी गणेशोत्सवाच्या तोंडावर लाल टपोऱ्या अमेरिकी द्राक्षांना मात्र मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाशी येथील घाऊक फळबाजारात या द्राक्षांची आवक वाढली असून किरकोळ बाजारात ही द्राक्षे २०० ते ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत.

अमेरिकेची द्राक्षे अशी ओळख असलेल्या या रेड ग्लोब जातींची द्राक्षे नेहमीच्या द्राक्षांपेक्षा आकाराने मोठी आणि रसरशीत असतात. या द्राक्षांचा रसही मधुर असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या द्राक्षांना मुंबई, ठाण्यातील बाजारांत चांगली मागणी असते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून या द्राक्षांची वाशी येथील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. सध्या ठरावीक व्यापारी १० ते २५ किलो वजनाच्या ५०-६० पेटय़ांची आवक करत असून अडीच हजार रुपयांपासून या पेटय़ांची विक्री केली जात आहे. किरकोळ बाजारात द्राक्षांच्या प्रतीनुसार २०० ते ३५० रुपये प्रति किलो असा दर या द्राक्षांना मिळत आहे.

लाल द्राक्षांचे महत्त्व

‘रेड ग्लोब’ ही द्राक्षे रक्तदाब नियंत्रणासाठी, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी तसेच त्वचेची लवचीकता पुर्नसचयित करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील या द्राक्षांचा प्रामुख्याने वापर होतो.

परदेशातून येणाऱ्या लाल द्राक्षांचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही द्राक्षे चांगली असल्याने त्यांचा रस करून पिण्याकडे नागरिकांचा कल असतो. यामुळे शहरी भागातील सधन वर्गाकडून याची चांगली खरेदी केली जाते.

– नितीन चासकर, फळ व्यापारी