ठाणे : ठाण्यातील बाळकुम भागातील प्रभावी राजकीय नेते माजी नगरसेवक संजय भोईर यांचा मोबाईल हॅक करून व्हॉट्सॲप खात्याद्वारे अनेकांकडे ४५ हजार रूपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.  याप्रकरणी संजय भोईर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल क्रमांक कोणी हॅक केला याचा शोध पोलिसांमार्फत सुरू आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर हे ठाण्यातील बाळकुम परिसरात प्रभावी राजकीय नेते आहेत. शुक्रवारी त्यांचा मोबाईल क्रमांक तसेच व्हॉट्सॲप खाते हॅक झाले. या व्हॉट्सॲप क्रमांकावरून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडे ४५ हजार रूपये मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला. संजय भोईर यांच्याकडून पैशांच्या मागणीचे काॅल येत असल्यामुळे अनेकांनी त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत माहिती दिली.

यानंतर मोबाईलमध्ये पैशाच्या व्यवाहारासाठी कोणतेही ॲप्लिकेशन वापरत नसल्याचे त्यांच्याकडून अनेकांना सांगण्यात आले. तसेच पैशांची मागणी करणारे काॅलही आपण केले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार गंभीर असल्यामुळे भोईर यांनी कापुरबावडी पोलिस ठाणे गाठले आणि तिथे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, भोईर यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आपले व्हॉट्सॲप हॅक झाल्याची ध्वनिचित्रफित प्रसारित केली आहे. यामध्ये ‘माझे व्हॉट्सॲप अज्ञातांकडून हॅक झाले आहे. सदर क्रमांकावरून कुणालाही कुठल्याही प्रकारचा मॅसेज येत असल्यास प्रतिसाद देऊ नये. कृपया सहकार्य करावे.’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांचे देखिल इन्स्टाग्राम खाते हॅक झाले होते.  आता ठाण्यातील माजी नगरसेवकाचे व्हॉटसॲप हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.