Thane Accident : शहापूर : राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग या दोन महामार्गांवर वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (आज) उघडकीस आली आहे. या घटनांमुळे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समृद्धी महामार्गावरील मुंबईकडील वाहिनीवर(Samruddhi Highway) कासगाव भागात झालेल्या अपघातात ट्रक चालक विजय उईके (३८) आणि ओंकार पंढरे (३२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई – नाशिक महामार्गावर चांदे गावा जवळ पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पीक-अप वाहनामधील जावेद शेख (३५, धसई, शहापुर) यांचा मृत्यू झाला आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झाले. मुंबई, ठाणे, भिवंडी गाठण्यासाठी या महामार्गाचा वापर नागपूर, छत्रपती संभाजीनगर सह विविध भागातील वाहन चालक, व्यवसायिक वाहन चालकांकडून होत आहे. परंतु समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे चित्र मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातातून स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबई नाशिक महामार्ग देखील नाशिकहून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरही अपघात होत आहेत. या महामार्गावर देखील पहाटेच्या सुमारास एका अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

यातील पहिली घटना समृद्धी महामार्गावर उघडकीस आली. मुंबईच्या दिशेने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी या दोघांचा मृत्यू झाला. विजय उईके आणि ओंकार पंढरे अशी मृतांची नावे आहेत.

तर मुंबई – नाशिक महामार्गावर एका पीकअप वाहनामध्ये कॅनमधील डिझेल भरल्यानंतर रस्त्यालगत उभे असणाऱ्या चालकाला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत शहापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.