पूजा साहित्यासह फुले, नारळ यांची भाववाढ; गणेशोत्सव सजावटीच्या साहित्याची चढय़ा दराने विक्री

सागर नरेकर
बदलापूर : इंधन दरवाढीने काकुळतीला आलेले सर्वसामान्य नागरिक गणरायाला साकडे घालण्याची तयारी करत असताना अन्य गोष्टींच्या महागाईचे विघ्न पुढे ठाकले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पूजा साहित्य, फुले तसेच नारळ या आवश्यक गोष्टींच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या सजावटीच्या साहित्याचीही चढय़ा दराने विक्री होत असल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले भाविक आणखी त्रस्त झाले आहेत.

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गणेशोत्सवावर असलेले निर्बंध आणि नागरिकांमध्ये असलेली भीती यांमुळे उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा झाला. मात्र, या वर्षी करोना निर्बंध शिथिल करण्यात आले असल्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह दांडगा आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्य़ातल्या जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी उसळून आल्याचे चित्र आहे. मात्र उत्सवासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या महागाईने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

गणेशोत्सवात महत्त्वाच्या असलेल्या नारळाचा भाव आठ ते पंधरा रुपयांपर्यंत वाढलेला आहे. आठवडाभरापूर्वी २५ ते ३० रुपयांना मिळणारे नारळ आता ३५ ते ४५ रुपयांना विकले जात आहेत. नैवेद्यासाठी लागणाऱ्या पाच फळांचा संच ८० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत विकला जातो आहे. तर फळांची किरकोळ किंमतही १० ते २५ रुपयांपर्यंत वाढल्याचे गणेशोत्सवाच्या निमित्ताने समोर आले आहे. ही दरवाढ फक्त किरकोळ बाजारात अधिकपणे दिसून येत असून विक्रेत्यांनी परिस्थितीनुसार दर वाढवल्याचे बोलले जाते.  पूजेच्या साहित्यात असलेली विडय़ाची पाने, केळीचे पान, सुपाऱ्या आणि इतर साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पाच ते दहा रुपये किलोपर्यंत आलेली झेंडूची फुले गुरुवारी किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपयांपर्यंत विकली जात होती. तर तयार हारांची किंमत ५० ते ७० रुपयांनी वाढलेली पाहायला मिळाली. हरतालिका पूजेसाठी लागणाऱ्या मूर्ती गेल्या वर्षांत ५० रुपयांना मिळत होत्या. त्यांची किंमत आता शंभरीपार झाल्याचे एका गृहिणीने सांगितले.

विघनटशील प्लास्टिक, फायबरपासून तयार करण्यात आलेल्या रंगबिरंगी झालरी, तोरण, माळा यांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. रोषणाईसाठी असलेल्या दिव्यांच्या माळा, आकर्षक बल्ब यांची किंमतही वाढली आहे. सजावटीतील कागद, पुठ्ठय़ाच्या किमती यापूर्वीच वाढल्या होत्या.