ठाणे : पक्षाभिनिवेश विसरून मराठी भाषेसाठी, मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मने जुळताना दिसली. त्याचा मनापासून आनंद वाटला. हा विजय सर्वांचाच आहे, त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे. ही एकी अशीच राहू दे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. मराठी माणसाची झालेल्या एकीनेच या सरकारला झुकवले, असे सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एक रहायलाच हवं, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये अशी मागणी विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. नागरिकांमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढायचा निर्णयही घेतला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आदेशाच्या प्रती जाळून आंदोलन केले होते. एकूणच या विषयावर राजकीय वातावरण तापताना दिसत होते. असे असतानाच १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही समाज माध्यमांवर व्यक्त केले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केवळ राजकीय हितासाठी हिंदी सक्तीचा मराठी मनांविरूद्ध घेतलेला निर्णय अखेर सरकारला मागे घ्यावा लागला. हे उशिरा सुचलेलं शहाणपण होते. किंबहुना, माझा असा अंदाज आहे की, ती सक्ती मागे घेण्यासाठीच लावण्यात आली होती. कारण, काल सकाळीच काही मंत्र्यांनी बोलायला सुरूवात केली होती की मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही. त्या आधीच आम्ही विचार करू, वगैरे वगैरे …. ! पण, कुठल्याही समितीने काहीही निर्णय दिला तरी ‘सक्ती’ हा शब्दच मान्य नाही. शिक्षणामध्ये सक्ती हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. शिक्षणात स्वातंत्र्य हवे. अगदी काहीही शिकण्याचे स्वातंत्र्य हवे. तरच माणूस फक्त शिक्षित नव्हे तर सुशिक्षित होतो. नाहीतर शिक्षित होऊनही अशिक्षित राहतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही एकी अशीच राहू दे

सोप्या भाषेत सांगायचे तर मराठी माणसाची झालेल्या एकीनेच या सरकारला झुकवले. पहिल्यांदाच असे दिसले की पक्षाभिनिवेश विसरून मराठी भाषेसाठी, मराठी मायबोलीसाठी तमाम मराठी मने जुळताना दिसली. त्याचा मनापासून आनंद वाटला. हा विजय सर्वांचाच आहे, त्यापेक्षा हा विजय मराठी एकीचा आहे. ही एकी अशीच राहू दे, महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एक रहायलाच हवं, आपण एक असायलाच हवं. कारण, शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राचे हित. पुन्हा एकदा एवढेच सांगतो, मराठी एकीचा विजय असो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.