कल्याण : माळशेज घाटातील धबधबे आणि हिरव्या दुलईत फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका पर्यटकांच्या मोटारीने माळशेज घाट परिसरात राहणाऱ्या एका आदिवासी पाड्यातील दोन पादचारी ग्रामस्थांना शनिवारी जोराची धडक दिली. या धडकेत एक ग्रामस्थ जागीच ठार झाला. दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी माळशेज घाट रस्त्यावर चार तास रस्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे, अहिल्याबाईनगर, जुन्नर भागातून मुंबईत येणारी आणि मुंबईतून जुन्नर, अहिल्यानगर, आळेफाटा भागात जाणारी वाहने माळशेज घाटाच्या दोन्ही बाजुला रस्ता रोको आंदोलनामुळे शनिवारी दुतर्फा अडकून पडली. सुरूवातीला टोकावडे पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांची मने वळवून त्यांना रस्ता रोको आंदोलनापासून परावृत्त करण्याचा आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईल यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थ पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते.
या अपघातात मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट भागातील आवळेचीवाडी येथील खंडू मेंगाळ हे मोटारीने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले. त्यांचे दोन सहकारी गणेश नवसू भला, दिनेश नवसू सिंगवा गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींमधील एकाला आळेफाटा येथील रुग्णालयात, अन्य एका जखमीला मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाऊस सुरू झाला की माळशेज घाटातील धबधबे वाहण्यास सुरू होतात. या घाटातील निसर्गरम्य वातावरण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालते. राज्याच्या विविध भागातील विशेषता मुंबई, ठाण्यातील पर्यटक नियमित माळशेज घाटात पावसाळ्यात फिरण्यासाठी येतात. पावसामुळे भातशेती, जंगल शिवारातील कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. शेतीविषयक कामे करून आवळेचीवाडी येथील खंडू मेंगाळ, गणेश बला, दिनेश सिगवा पायी माळशेज घाटातून आवळेची वाडी भागातील एका वळणावरून आपल्या घरी परतत होते. माळशेज घाटातून वाहनांची वर्दळ सुरू होती.
वळण रस्त्यावरून तिन्ही ग्रामस्थ पायी जात असताना मुंबईतून माळशेज घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची भरधाव वेगात असलेली मोटार खंडू, दिनेश आणि गणेश या पादचाऱ्यांना जोराने धडकली. मोटारीचा जोराचा फटका बसल्याने खंडू मेंगाळ जागीच ठार झाला. इतर दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आवळेची वाडीतील सर्व ग्रामस्थ घटनास्ठळी आले. त्यांनी हा अपघात करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाईची मागणी केली. बाहेरून माळशेज घाट येणारे हे लोक बेशिस्तीने वागतात, धिंगाणा घालतात आणि आमच्या मरणाला कारणीभूत ठरतात, असे आरोप ग्रामस्थांनी केले.
या अपघातावरून गावकऱ्यांनी चार तास माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी रोखून धरला. ग्रामस्थ रस्त्यांवरून बाजुला होत नसल्याने स्थानिक पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहापूर, मुरबाड, किन्हवली, बदलापूर परिसरातून वाढीव पोलीस बळ मागविण्यात आले. ग्रामस्थांची समजूत काढून घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.