कल्याण : कल्याणमधील आधारवाडी तुरूंगातील एका न्यायबंदीने ‘मला ठाणे येथील तुरूंंगात जायचे नाही. मला आधारवाडी तुरूंगातच ठेवा,’ असा आक्रमक पवित्रा घेत गुरूवारी सकाळी पोलीस वाहनातच आधारवाडी तुरूंंग भागातील चौकात पोलीस वाहनात गोंधळ घातला. त्याने आपल्या तोंडात लपवून ठेवलेली एक धारदार पात बाहेर काढून हिंसक पवित्रा घेत जवळील दोन्ही पोलिसांना बाजुला ढकलून दिले. स्वताच्या गळ्यावर धारदार पातेने वार करून स्वतला जखमी करून घेतले आणि सरकारी कामात अडथळा आणला.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरूंगा बाहेरील कल्याण-दुर्गाडी किल्ला-ठाणे रस्त्यावरील आधारवाडी चौकात ही घटना गुरूवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. सूरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा (२९) असे या न्यायबंदीचे नाव आहे. तो एका गुन्ह्याच्या प्रकरणात आधारवाडी तुरूंगात आहे. यापूर्वीही त्याने कल्याण न्यायालय परिसरात गोंधळ घातला होता.

न्यायबंदीने पोलीस वाहनात सार्वजनिक रस्त्यावर घातलेला गोंधळ, स्वतावर धारदार पातेने केलेले वार आणि पोलिसांंना आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामात अडथळे आणले म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण घुटूगडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या निर्देशावरून सुरज सिंग याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्यातील प्राथमिक माहिती अहवालातील माहिती, अशी की आरोपी सूरज सिंग एका गुन्ह्याच्या प्रकरणात आधारवाडी तुरूंगात अटकेत आहे. प्रशासकीय निर्णयानुसार सूरज सिंगला ठाणे येथील मध्यवर्ति तुरूंगात ठेवण्याचा निर्णय आधारवाडी कारागृह प्रशासनाने घेतला. गुरवारी सकाळी पोलीस पोलीस वाहनात बसवून सूरज सिंगला ठाणे येथील मध्यवर्ति तुरूंगात घेऊन पोलीस चालले होते. वाहन आधारवाडी तुरूंगाकडून आधारवाडी चौकापर्यंत पोहचले होते. आपणास ठाणे येथील तुरूंगात नेले जात आहे याची कुणकुण वाहनात लागल्यावर सूरज सिंग याने आक्रमक पवित्रा घेतला.

मला ठाणे तुरूंगात जायाचे नाही. मला आधारवाडी तुरूंगात राहायचे आहे. मला तुम्ही ठाणे येतील तुरूंगात नेले तर मी माझ्या गळ्यावर धारदार पातेने वार करून घेईन, अशी धमकी सूरजने वाहनातील बंदोबस्तावरील पोलिसांना दिली. पोलीस त्याला समजावत असताना सूरज सिंगने अचानक त्याच्या बाजुला बंदोबस्तासाठी बसलेल्या अंबरनाथ पोलीस ठाण्यातील हवालदार शेख, खरे यांना आसनावरून ढकलून दिले. तेवढ्या फरकात आरोपी सूरज सिंगने स्वताच्या तोंडात लपवून ठेवलेली धारदार पात बाहेर काढून स्वताच्या गळ्यावर वार करून स्वताला जखमी करून घेतले. सूरज असे काही करेल असे पोलिसांना वाटले नसल्याने पोलिसांची काही क्षण तारांंबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकारानंतर पोलिसांनी सूरज विरुध्द गुन्हा दाखल केला. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरवसे याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक एस. एस. शिवले यांनी घटनास्थळी भेट दिली.