कल्याण – लांबपल्ल्यांच्या एक्सप्रेसमधून रात्रीच्या वेळेत झोपुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्या, खिशांमधून किमती ऐवज, रोख रकमा असा १६ गुन्ह्यांच्या माध्यमातून २२ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज चोरणाऱ्या उत्तरप्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांनी हे गुन्हे कर्जत, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले आहेत.

या चोरट्यांकडून पोलिसांनी ३१६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७२ हजार रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. वकार आलम तौकीर खान (३९) जुगल किशोर ओमप्रकाश शर्मा (४१) अशी चोरट्यांची नावे आहेत. वकार हा उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जुगल हा उत्तरप्रदेशातील कानपूर येथील रहिवासी आहे. मे मध्ये कोईम्बतूर राजकोट एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा रात्रीच्या वेळेत चोर खिसा कापून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

कल्याण गुन्हे शाखेचे पथक याप्रकरणाचा तपास करत होते. रात्रीच्या वेळेत प्रवासी झोपले की प्रवासी म्हणून एक्सप्रेसमधून प्रवास करणारे काही चोरटे रात्रीच्या वेळेत या चोऱ्या करत असल्याचे आणि त्यांची चोरीची पध्दत एकच असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले होते. हे चोरटे चोरी केल्यानंतर एक्सप्रेसचा थांबा असलेल्या कर्जत, ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकात उतरून किंवा ज्या रेल्वे स्थानक भागात एक्सप्रेसचा वेग मंदावला की हे चोरटे उतरून पसार होत होते. चोरट्यांची चोरीची एकसारखी पध्दत असल्याने ते ठराविक चोरटेच या चोऱ्या करत आहेत याचा पोलिसांना दाट संशय होता.

पोलिसांनी विविध रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून, जुन्या गुन्ह्यांची माहिती काढून आरोपींचा शोध सुरू केला होता. हा तपास सुरू असताना कोईम्बतूर राजकोट एक्सप्रेसमध्ये चोरी केलेले दोन इसम कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात येणार आहेत, अशी गुप्त माहिती कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांना मिळाली. ठरल्या वेळेत दोन्ही इसम कल्याण रेल्वे स्थानक भागात येताच पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कर्जत, ठाणे, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एकूण १६ गुन्ह्यांची कबुली दिली.

कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत आठ, ठाणे हद्दीत चार, कर्जत हद्दीत तीन आणि डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत एक असे गु्न्हे या दोन जणांनी केले आहेत. या चोरट्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय खेडकर,पोलीस निरीक्षक रोहित सावंत, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देविदास अरण्ये, दीपक पाटील, सुधाकार सावंत, स्मिता वसावे, अक्षय चव्हाण, संदीप गायकवाड, अनिल राठोड, रूपेश निकम, राम जाधव, प्रमोद दिघे, स्वप्निल नांगरे, विक्रम चावरेकर, अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.