कल्याण : गेल्या महिन्यात कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथे सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून या इमारतीमधील तीन घरांमधील सहा जण मरण पावले होते. या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली होती. आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी दुपारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील हे प्रत्येकी सहा लाखाच्या मदतीचे धनादेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना प्राप्त झाले होते. हे धनादेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या माध्यमातून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांना सुपूर्द करण्यात आले. शनिवारी सकाळी आमदार सुलभा गायकवाड यांनी सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना आपल्या कल्याण पूर्वतील जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेतले. हे मदतीचे धनादेश सहा कुटुंबीयांना देण्यात आले.
गेल्या महिन्यात दुपारच्या वेळेत सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावर फरशा बसविण्याचे काम सुरू होते. हे काम करण्यासाठी घर मालकाने सोसायटीची परवानगी घेतली नव्हती. क्रॅकरच्या साहाय्याने फरशा काढण्याचे काम सुरू असताना वीस वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब क्रॅकरच्या दणक्याने कोसळले. ते एकापाठोपाठ तिसरा, दुसरा आणि पहिल्या माळ्यावर पडले. यावेळी स्लॅबखाली काही सदस्य दबले गेले. काही स्लॅबच्या माराने गंभीर जखमी झाले होते.
पालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून स्लॅबखाली दबलेल्या काही रहिवाशांचे प्राण वाचविले. स्लॅबखाली दबून सुशिला गुजर (७८), नामस्वी शेलार (दीड वर्ष), व्यंकट चव्हाण (३२), सुनीता साहू (३८), प्रमिला साहू (५६), सुजाता पाडी (३२) या रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. सहा रहिवासी जखमी झाले होते.
या दुर्घटनेनंतर आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इमारत दुर्घटनेतील रहिवाशांना सोबत घेऊन भेट घेतली होती. या इमारतीमधील मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपये देण्याची घोषणा केली होती.
हे धनादेश शनिवारी आमदार सुलभा गायकवाड यांना तहसीलदार कार्यालयातून प्राप्त झाल्यावर त्यांनी तातडीने या धनादेशांचे इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना वाटप केले. या दुर्घटनेला जबाबदार धरून पालिकेने कृष्णा चौरासिया या सदस्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाने मदत करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये देण्याची घोषणा केली होती. या मदतीचे धनादेश जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आल्यानंतर शोकाकुल कुटुंबीयांना शनिवारी वाटप करण्यात आले. – सुलभा गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व.