ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर बुधवारी रात्री बदलापूरच्या दिशेने निघालेली लोकल अचानक काही मिनीटांसाठी थांबविण्यात आली. या प्रकारामुळे या रेल्वेगाडी मागे असलेल्या इतर रेल्वेगाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने रात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरुन धिम्या दिशेकडील मुंबईहून डोंबिवली, कल्याण, बदलापूरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात.
बुधवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बदलापूरच्या दिशेने निघालेली रेल्वेगाडी फलाट क्रमांक दोनवर आली होती. गाडी फलाट दोनवर थांबून पुन्हा सुरु झाल्यानंतर काही अंतर गाडी पुढे जाऊन पुन्हा थांबली.
प्रवाशाने साखळी ओढल्याने हा प्रकार घडला की, इतर काही कारण होते, याबाबत पूर्ण माहिती मिळू शकली नाही. परंतु ही रेल्वेगाडी काही मिनीटे फलाट क्रमांक दोनवर उभी होती. ही रेल्वेगाडी फलाटावर थांबून असल्याने या रेल्वेगाडीमागे असलेल्या इतर रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे रात्री धिम्या रेल्वेगाडीने घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.