scorecardresearch

ठाणे जिल्ह्याला उद्या हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना

Thane red alert
एनडीआरएफच्या दोन तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे ठाणे जिल्ह्याला उद्या(शुक्रवारी) अतिवृष्टीचा (रेड अलर्ट ) इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील धोक्याच्या ठिकाण जाऊ नये अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही पद्धतीची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलैच्या कालावधीत तब्बल ४०६.९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गतवर्षी जिल्ह्यात याच कालावधीत २१२.८ इतक्या पावसाची नोंद करण्यात अली होती. यामुळे मागील सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर या पैकी सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ, उल्हासनगर आणि ठाणे या तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्जत तालुक्यात देखील मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. परंतु, उल्हासनदीने अद्याप धोका पातळी ओलांडली नसल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

कल्याण आणि ठाणे येथे एनडीआरएफच्या दोन तुकड्या नियुक्त –

तसेच गेल्या २४ तासात बारवी धारण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी साठ्यात देखील तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे ठाणे जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी ९ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला होता. तर सध्या हवामान खात्यातर्फे ११ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यस्थापन विभागातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात कोणत्याही पद्धतीची नैसर्गिक आपत्ती आल्यास नागरिकांच्या मदतीसाठी कल्याण आणि ठाणे येथे एनडीआरएफच्या दोन तुकड्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात पाच यांत्रिकी बोटी सज्ज –

तसेच अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून जिल्ह्यात पाच यांत्रिकी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगर परिषदा आणि तहसील कार्यालयांना एकूण ६९ बोटी देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meteorological department issues red alert to thane district tomorrow msr