लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : गेल्या १५ वर्षात मीच मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे मिळवत सुभाष पवार मोठे झाले आहेत. यांना पाच वर्षे बदलापूर आठवत नाही. निवडणुका आल्या की बदलापुरची आठवण येते, अशी खरमरीत टीका आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचारातून पैसे कमावणे हीच यांची वृत्ती असल्याचाही आरोप कथोरे यांनी केला आहे. कथोरे यांनी पवार यांना पुन्हा एकदा कंत्राटदार म्हणून हिनवत सुभाष पवार यांना लक्ष्य केले आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी आपल्या प्रचाराची धार टोकदार केली असून त्यांच्या विरोध उमेदवार असलेल्या सुभाष पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुभाष पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कथोरे यांनी पवार यांना कंत्राटदार म्हणून हिनवले आहे. तुम्हाला आमदार हवा की कंत्राटदार हवा असा प्रश्न किसन कथोरे अनेकदा आपल्या सभेत उपस्थित करतात. गेल्या काही दिवसात कथोरे आणि सुभाष पवार यांच्यातील हल्ला प्रतिहल्ला याच कंत्राटदार शब्दाभोवती फिरतो आहे. सुभाष पवार यांनी यापूर्वीही कथोरे यांच्या कंत्राटदार टीकेला उत्तर देताना कथोरे यांच्या आसपास असलेले सर्वच कंत्राटदार असल्याचा प्रत्यारोप केला होता. कथोरे स्वतः जंगलाचे कंत्राटदार होते असाही आरोप पवार यांनी केला होता.

आणखी वाचा-कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक

नुकत्याच बदलापूर पूर्वेत पार पडलेल्या प्रचार सभेत कथोरे यांनी पुन्हा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझ्या समोर विरोधी पक्षांना उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आता कंत्राटदार उमेदवार दिला. या माणसाने १५ वर्ष माझ्याकडून कामे घेतली आणि मोठा कंत्राटदार झाला. त्यांच्या चौकशा केल्या तर सर्व कळेल, असे कथोरे यावेळी म्हणाले. त्यांच्या एका कॉलेजची चौकशी करावी. तिथे खुप वाईट परिस्थिती आहे. देणग्यांच्या पावत्या नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही असा आरोप कथोरे यांनी केला. भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कमवणे हीच त्यांची वृत्ती असल्याची टीकाही कथोरे यांनी यावेळी केली.

आणखी वाचा-कल्याणमधील ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांचा राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कथोरे यांना संधी दिल्याचे वक्तव्य सुभाष पवार यांनी केले होते. त्यावर बोलताना कथोरे यांनी उत्तर दिले. मला संधी जनतेने दिली आहे. हे मला संधी देणारे कोण, यांचे वडील माझ्यासमोर पराभूत झाले आहेत, असेही कथोरे यावेळी म्हणाले. बदलापुरकर कायमच माझ्या पाठिशी आहेत. त्यांना बदलापूर कधीही आठवत नाही. निवडणुका आल्या की बदलापूर आठवते, अशीही टीका कथोरे यांनी पवार यांच्यावर केली.