ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मराठवाड्यासह विविध भागातील पूरामुळे शेती तसेच नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे. मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुंबईतील व्यापाऱ्यांनी मदत दिली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ही भरीव मदत देण्यात आली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. सर्वत्र चिखल पसरला आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी यासाठी विरोधी पक्ष नेते आक्रमक भूमिका घेत आहे. नुकतेच राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात येणारा भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनाची आवक देखील घटली आहे. भाजी, फळ, फुले महाग झाल्याने नागरिक देखील चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने त्यांना मदत मिळत असली तरीही ती पुरेशी नाही. त्यामुळे आता अनेक संस्था विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदत दिली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये भरीव मदत देण्यात आली आहे. समितीने एकूण ४४ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीला सूपूर्त केला आहे.

कोणत्या विभागाकडून किती निधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजाराने २८ लाख रुपये, भाजीपाला बाजाराने ८ लाख १० हजार रुपये, अन्नधान्य बाजाराने पाच लाख रुपये आणि कांदा बटाटा बाजाराने तीन लाख रुपये असे एकूण ४४ लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे देण्यात आले. तसेच थेट शेतकऱ्यांना देखील अन्नधान्य पुरवठा करण्यात आला असे मुंबई एपीएमसीने स्पष्ट केले.