अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान बहुप्रतिक्षीत असलेल्या चिखलोली स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. ओव्हर हेड उपकरणे उभारून कार्यान्वित करणे तसेच स्थानकाच्या उभारणी अशा दोन निविदा आहेत. यामुळे चिखलोली स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानकाच्या प्रत्यक्ष जागेवर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. त्यातील हा महत्वाचा टप्पा मानला जातो आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण होण्याची आशा आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान चिखलोली स्थानकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या भागिदारीत या स्थानकाची उभारणी केली जाते आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ च्या माध्यमातून कल्याण बदलापूर स्थानकादरम्यान १४ किलोमीटर लांबीची तिसरी चौथी मार्गिका उभारली जाते आहे. यात चिखलोली रेल्वे स्थानकही महत्वाचे आहे. एकूण १ हजार ५१० कोटी रूपयांच्या खर्चातून या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाची उभारणी केली जाते आहे. गेल्या चार वर्षात या प्रकल्पातील फक्त २५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. यासोबतच चिखलोली स्थानकाचे कामही सुरू आहे. या स्थानकातील काही अनुषंगीक कामे सुरू आहेत. यासोबतच आता येथे ओव्हरहेड उपकरणे उभारणे, त्यांचे आरेखन, तपासणी आणि कार्यान्वीत करण्याच्या कामाची निविदा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच चिखलोली रेल्वे स्थानकाच्या प्रत्यक्ष बांधकामाचीही निविदा जाहीर केली आहे. ११ कोटी ४८ लाख २ हजार ७५९ रूपयांची एक तर २१ कोटी ६४ लाख ३२ हजार ९७४ रूपयांची दुसरी अशा दोन निविदांचा याच समावेश आहे. कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान ओव्हरहेड उपकरणांचे काम तसेच स्थानक उभारणी आणि अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड उपकरणांचे काम आणि स्थानकाची उभारणी अशी या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी आणि ओव्हरहेड उपकरणांची कामे पूर्ण झाल्यास रेल्वे स्थानक कार्यान्वीत होणे शक्य होणार आहे. त्यामुळे लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक सुरू होण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा…ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानक उभारणीत प्रगती

चिखलोली रेल्वे स्थानकाच्या मंजुरीसाठी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे या स्थानकाला मंजुरी मिळाली. २०२० वर्षात स्थानकाचा संकेतांक, अंतर आणि भाडे निश्चित करण्याचे पत्र रेल्वेने मंजूर केले. २०२२ मध्ये यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले. २०२३ आणि २०२४ या वर्षात विविध टप्प्यातील कामांसाठी विविध निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता उर्वरीत कामांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.