Samruddhi Highway : ठाणे : नागपूरहून मुंबई गाठण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती झाली. या महामार्गावर वाहने सुसाट असतात. असे असतानाही येथे लुटारुंच्या टोळ्या सक्रीय झाल्यात का, असा प्रश्न निर्माण होत आहे. समृद्धी महामार्गावर पोलीस असल्याची बतावणीकरुन एका टेम्पो टेम्पोमधील २० म्हशींचे पारडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यामधील तक्रारदार हा एका व्यवसायिकाकडे कामाला असून तो परभणी भागातील रहिवासी आहे. तो नेहमी त्याच्या मालकाच्या आदेशानुसार जालना येथून भिवंडी येथे म्हशीचे पारडे टेम्पोने नेत असे. २६ ऑगस्ट या दिवशी एका टेम्पोमध्ये त्याने २० पारडे भरले. तक्रारदार हा टेम्पो चालकासोबत मदतनीस म्हणून भिवंडीच्या दिशेने निघाला होता. भिवंडी येथे येण्यासाठी त्यांना जालना येथून समृद्धी महामार्गाने भिवंडीच्या दिशेने प्रवास सुरु केला. समृद्धी महामार्गावरील राया शिवारातील टोलनाका पार केल्यानंतर टेम्पो चालकाने टेम्पो बाजूला उभा केला. तेथे नैसर्गिकविधी केल्यानंतर ते पुन्हा टेम्पोमध्ये बसले. त्यावेळी टेम्पो चालकाला एका व्यक्तीने संपर्क साधला. २७ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ते प्रवास करत असताना अचानाक एका पांढऱ्या दुचाकीवरुन दोघे आले. त्यांनी टेम्पो अडविला. तसेच तक्रारदार याच्या शर्टची काॅलर पकडून त्याला पोलीस ठाण्यात जायचे असल्याचे धमकावले.

अन् अशी झाली चोरी

दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला दुचाकीवर बसण्यास सांगितले. तर टेम्पो चालकाला टेम्पो दुचाकीच्या मागे आणण्यास सांगितले. ते भिवंडी – वडपे मार्गावर आले असता, येथील सेवा रस्त्याजवळ त्यांनी दुचाकी थांबविली आणि तक्रारदाराच्या खिशातील मोबाईल, २ हजार २०० रुपयांची रोकड त्यांनी काढून घेतली. त्यानंतर ते दुचाकीवरील दोघेही तेथून निघून गेले. त्यांच्या दुचाकीवर वाहन क्रमांक नव्हता. त्यामुळे ते पोलीस नसल्याचे तक्रारदाराला लक्षात आले. दरम्यान, काही मीटर अंतरावर रस्ते दुरुस्तीचे काम सुरु असल्याने तेथील एका सुरक्षा रक्षकाकडे त्याने त्याच्या भावाला संपर्क करण्यासाठी मोबाईल घेतला. त्याच्या भावाला घडलेला घटनाक्रम सांगितला. दोन तासांनी त्याचे सहकारी तेथे आले असता, त्यांनी टेम्पोचा शोध घेतला. त्यांना टेम्पो आढळून आला. परंतु त्यामध्ये चालक नव्हता. त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. तसेच त्यातील पारडे देखील गायब होते. त्यांनी तात्काळ पडघा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.