डोंबिवली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीतील तीन पर्यटकांचे मृतदेह विशेष विमानाने बुधवारी दुपारी मुंबईत आणण्यात येणार आहेत. तेथून हे मृतदेह खास शववाहिकांमधून डोंबिवलीत आणले जाणार आहेत. तिन्ही मृत पर्यटकांचे नातेवाईक बुधवारी सकाळी नवी दिल्ली येथे गेले. तेथून काश्मीर येथे मृतदेह ताब्यात घेणे आणि तेथे अडकलेल्या आपल्या नातेवाईक पर्यटकांना ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत.

शिंदे शिवसेनेचे डोंबिवली उपजिल्हाप्रमुख राजेश कदम या चमुचे नेतृत्व करत आहेत. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या शहरात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष विमान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डोंबिवलीतील सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील विष्णुनगर भागातील विजयश्री सोसायटी येथे संजय लक्ष्मण लेले यांचे पार्थिव आणले जाणार आहे. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी कविता लेले, मुलगा हर्षल (२०) आणि नातेवाईक आहेत.

हर्षलच्या हाताच्या बोटाला शस्त्राची गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. घडल्या प्रकाराने पत्नी कविता, मुलगा हर्षल हादरून गेले आहेत. आपल्या छिन्नविछिन्न झालेल्या वडिलांचा मृतदेह शोधणे, पोलीस प्रक्रिया पार पाडणे यासाठी बालवयात हर्षलला धावपळ करावी लागली.

संजय लेले यांचे पार्थिव एआय १६६२ या विशेष विमाने दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर येईल असे शासनाच्या आपत्कालीन विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अतुल मोने यांंचे पार्थिव एआय २६६२ या विशेष विमानाने दुपारी सव्वा वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर येईल. अतुल मोने यांचे पार्थिव डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागातील सम्राट चौकाजवळील श्रीराम आंचल सोसायटीत त्यांच्या राहत्या घरी आणले जाईल. अतुल मोने यांच्या सोबत त्यांची पत्नी अनुष्का, मुलगी ऋचा (१८) आहेत. या दोघी सुखरूप आहेत.

हेमंत जोशी यांचे पार्थिव एआय २६६२ या विशेष विमानाने दुपारी सव्वा वाजता येईल. तेथून हे पार्थिव शववाहिकेमधून हेमंत जोशी यांच्या डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानाजवळील सावित्री सोसायटीत आणले जाईल. त्यांच्या सोबत पत्नी मोनिका जोशी, मुलगा ध्रुव (१६) हे आणि नातेवाईक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेले, जोशी आणि मोने हे एकमेकांचे जुने मित्र, नातेवाईक आणि एक परिवारासारखे राहत होते. एकमेकांच्या सुखदुखात आम्ही नेहमी सहभागी होत होतो. असा काही दुखद प्रसंग एकावेळी या तिघांवर येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया संजय लेले यांचे नातेवाईक कौस्तुभ लेले यांनी दिली.