Dombivli Station Congestion / डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटावर पादचारी जिने देखभाल दुरुस्ती, नवीन पुलाची उभारणी, सरकता जिन्याच्या उभारणीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे प्रवाशांचे फलाटावर उतरणे चढण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानकात जागोजागी सुरू असललेल्या या कामांमुळे प्रवाशांची जागोजागी कोंडी होत आहे. आणि प्रवाशांना वळसे घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या देखभालीच्या कामांमुळे प्रवासी मात्र त्रस्त आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात मध्यभागी फलाट क्रमांक एक पंडित दिनदयाळ रस्ता ते फलाट क्रमांक पाच रामनगर परिसर असा अखंड पादचारी पूल उभारणीचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. या कामासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेले रेल्वे आरक्षित तिकीट केंद्र, या भागातील जिने काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर उतरावे लागते. प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावरून इच्छित ठिकाणच्या जिन्यावर जावे लागते.
फलाट क्रमांक दोन आणि तीनवर कल्याण बाजूला गेल्या दोन वर्षापासून सरकता जिना उभारणीचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू होते. सरकत्या जिन्याची यंत्रणा फलाटावर आणण्यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लाॅक मिळत नसल्याने हे काम सात ते आठ महिने बंद होते. मधल्या काळात सरकत्या जिन्याची यंत्रणा रेल्वे स्थानकाच्या बाजुकडून फलाटावर आणण्यात ठेकेदाराला यश आले.
आता सरकता जिना उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. या सरकत्या जिन्याच्या विद्युत चाचण्या पूर्ण झाल्या की येत्या महिनाभरात सरकता जिना सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. या सरकत्या जिन्यामुळे डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर कल्याण दिशेने उतरणाऱ्या प्रवाशांना फलाटाच्या मध्यभागी येऊन मग जिन्यावर जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत मुंबईकडून येणाऱ्या जलद लोकल आणि मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गर्दीमुळे प्रवाशांना धक्केबुक्के खात मधल्या जिन्याच्या दिशेने जावे लागते. या गर्दीमुळे अनेक वेळा घाईत असलेल्या प्रवाशांच्या लोकल निघून जातात.
फलाट क्रमांंक पाचवर पश्चिम दिशेने उतरणारा जिना गेल्या वर्षापासून नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी तोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्व बाजूकडील सरकता जिना किंवा पादचारी जिन्या फलाट क्रमांक पाचवर उतरावे लागते.
डोंबिवली रेल्वे स्थानकात जागोजागी सुरू असलेले पादचारी जिने देखभाल दुरुस्ती, नवीन पादचारी पूल उभारणी आणि सरकत्या जिन्यांच्या कामांमुळे प्रवाशांना फलाटावर येताना वळसे घेऊन यावे लागते. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या प्रवाशांची या कामांमुळे सर्वाधिक कोंडी होते. ही कामे लवकर पूर्ण करावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
प्रवाशांच्या दीर्घकालीन सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पूल, सरकते जिने, पादचारी जिने उभारणीची कामे सुरू आहेत. या कामांचा वेग वाढवून ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा. डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.