कल्याण – ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरे मेट्रो ५ प्रकल्पाच्या माध्यमातून बदलापूर शहराशी थेट जोडायची असतील तर बदलापूर शहराकडे येणारी मेट्रो ५ ही बदलापूर शहराजवळील चिखलोली गावापर्यंत मर्यादित न ठेवता या मेट्रोचा मार्ग बदलापूर बस स्थानकापर्यंत विस्तारणे आवश्यक आहे. चिखलोलीपर्यंत मंजूर झालेला मेट्रो ५ प्रकल्पाचा मार्ग बदलापूर पश्चिमेतील बस आगारापर्यंत विस्तारण्यात यावा. यासाठी आवश्यक मंजुरीच्या प्रक्रिया मेट्रो ५ प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि बदलापूर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राम पातकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बदलापूर शहर परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. लोकवस्ती वाढत आहे. त्याप्रमाणात या भागात रस्ते वाहतूक, रेल्वे, इतर वाहतूक सुविधा, पर्यायी रस्ते मार्ग, वाढीव पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी माजी नगराध्यक्ष राम पातकर शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत. अलीकडेच त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने कर्जत तालुक्यातील मागील अनेक वर्षांचे रखडलेले पोशिर आणि शिलार धरण प्रकल्प मंजूर केले. बदलापूर, चिखलोली ते कर्जत-पनवेल लोकल प्रवासी वाहतुकीसाठी ते प्रयत्नशील आहेत.

शहराचे नागरीकरण होत असतानाच या महत्वाच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. एकदा शहर वाढले की आवश्यक सुविधा शहरात देता येत नाहीत आणि त्या शहराचे पूर्ण नियोजन बिघडते. हा प्रकार बदलापूर शहरात होऊ नये म्हणून आवश्यक नागरी सुविधांसाठी प्रयत्नशील आहोत, असे पातकर यांनी सांगितले. बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या, मुंबई शहर परिसरात जाणारा वाढता नोकरदार वर्ग विचारात घेऊन शासनाने मेट्रो ५ प्रकल्प बदलापूर शहराजवळील चिखलोली गावापर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलापूर शहर थेट कल्याण, भिवंडी आणि ठाणे शहरांना जोडायचे असेल आणि या चारही शहरांमधील प्रवाशांना एका बैठकीत मेट्रोने प्रवास करण्यासाठी मेट्रो मार्ग बदलापूर शहरात पश्चिमेतील बस आगारापर्यंत आणणे आवश्यक आहे. बदलापूर रेल्वे स्थानक ते बदलापूर बस आगार दरम्यान स्कायवाॅक आहे. बस, रेल्वे आणि मेट्रो अशी तिन्ही दळणवळणाची साधने एकाच ठिकाणी आली तर प्रवाशांची सोय होईल. प्रवाशांना वळसा घालून चिखलोली स्थानकापर्यंत जाण्याचा जो द्रविडीप्राणायम करावा लागणार आहे. तो बदलापूर बस आगारापर्यंत मेट्रो मार्ग आणल्याने टळणार आहे. प्रवासी हिताचा विचार करून शासनाने चिखलोलीपर्यंत आणलेला मेट्रो ५ मार्ग बदलापूर रेल्वे स्थानक आणि बदलापूर बस आगाराला जोडेल अशा पध्दतीने बस आगारपर्यंत विस्तारित करावा. यासाठीच्या आवश्यक प्रक्रियांना लवकर मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी पातकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बदलापूर शहर परिसराचे नागरीकरण, प्रवाशांच्या हिताचा विचार केला तर चिखलोलीपर्यंत मंजुर केलेला मेट्रो ५ प्रकल्प बदलापूर शहरातील बस आगारापर्यंत विस्तारित करणे आवश्यक आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहोत. – राम पातकर, अध्यक्ष, बदलापूर शेतकरी संघर्ष समिती.