कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे रिक्षा भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. ही भाडे वाढ तीन ते पाच रूपयांपर्यंत आहे. परंतु, या भाडे वाढीचा गैरफायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवासांकडून वाढीव पाच ते दहा रूपये वसुलीला सुरूवात केली आहे.वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे यामुळे अगोदरच त्रस्त असलेला प्रवासी अचानक केलेल्या या भाडेवाढीने हैराण आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी वर्ग नोकरदार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा कल्याण, डोंबिवली शहर परिसरात जेमतेम असल्याने प्रवाशांना वाहतुकीसाठी रिक्षेवर अवलंबून राहावे लागते. रिक्षा चालक प्रवाशांना भाडे वाढीच्या माध्यमातून वेठीस धरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ भागात ही भाडेवाढ लागू झाली आहे.
करोना महासाथीच्या काळात सन २०२२ मध्ये रिक्षा चालकांनी मनमानी करत रिक्षा भाडेवाढ केली होती. सीएनजी, इंधनाचे दर वाढले असे कारण चालकांनी दिले होते. त्यानंतर ही इंधन दरवाढ कमी झाली तरी त्यावेळी चालकांनी भाडे वाढ कमी केली नाही. आता शासनाने अधिकृतपणे भाडे वाढ लागू केल्याने रिक्षा चालकांनी या वाढीचा गैरफायदा घेत रेल्वे स्थानक ते प्रवाशाचे ठिकाणापर्यंत मनमानीने भाडे वसुली करण्यास सुरूवात केली आहे. ज्या ठिकाणी तीन ते पाच रूपये वाढ अपेक्षित आहे. तेथे पाच ते दहा रूपये वाढीव आकारण्यास रिक्षा चालकांनी सुरूवात केल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. ज्याठिकाणी प्रवासी यापूर्वी रिक्षा प्रवासासाठी १५ रूपये मोजत होता. तेथे त्याला आता तीन रूपये भाडे वाढीमुळे १८ रूपये, २२ रूपयांच्या ठिकाणी २५ रूपये आणि ४० रूपयांऐवजी १० रूपये वाढीमुळे ५० रूपये मोजावे लागत आहेत.
यापूर्वी रिक्षा चालक आपल्या आसनाशेजारी मागील आसनावरील तीन प्रवाशांबरोबर चौथा प्रवासी घेऊन वाहतूक करत होते. या चौथ्या आसनावरील प्रवासी वाहतुकी विरुध्द वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली आहे. रिक्षा भाडेवाढीचे कारण मिळाल्याने चालकांनी मनमानीने इच्छित ठिकाणचे भाडे वाढवून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात रिक्षेतील मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक केली जात नाही. प्रवाशांना रिक्षा चालकांच्या मनमानी भाडे वाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेअर रिक्षेतून प्रवासी यापूर्वी १२ ते २० रूपयांपर्यंत प्रवास करत होते. या भाडे दरात पाच ते दहा रूपयांची वाढ करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेत आनंदनगर १५ रूपये भाडे, ठाकुरवाडी १५ रूपये, गावदेवी, मोठागाव २० रूपये आकारले जात आहेत, असे प्रवाशांनी सांंगितले.
महानगर परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाप्रमाणे सीएनजी रिक्षेसाठी दीड किमीच्या प्रवासासाठी २६ रूपये भाडे वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे शेअर भाडे करण्यात आली आहे. तरीही रिक्षा चालक प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारत असतील त्यांनी ९४२३४४८८२४ या व्हाॅट्स क्रमांकावर रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक पाठवावा. आशुतोष बारकुळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.