कल्याण- कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्याची आता काहींना स्वप्ने पडू लागली आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात या होतकरुंनी विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. आता कामे आणि कर्तृत्व न दाखविता कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्याची स्वप्न काही मुंगेरी लालना पडत असतील तर त्यांनी निवडणूक लढविण्यापूर्वी नावापुढे आजीच्या जागी माजी शब्द लागणार नाही ना, याची काळजी घ्यावी, असा टोला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा >>> डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार; डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा

काही दिवसापूर्वी मनसेचे आमदार पाटील यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. काही फलकांवर तसा उल्लेखही करण्यात आला. त्यावर कल्याण लोकसभेचा खासदार मीच असेल आणि यापूर्वीपेक्षा मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईन, असा दावा खासदार शिंदे यांनी केला आहे. डोंबिवली जवळील खोणी-शिरढोण येथील म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांचे स्नेहसंमेलन आणि खासदार शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम रहिवाशांनी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. म्हाडा वसाहतीमधील घरे लाभार्थींना वेळेवर मिळावित. येथे पाण्यासह इतर सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. ही कामे केल्यानंतर कधीही स्वत:हून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांची कामे करत रहा. त्यामधून तुम्हाला कामाची पावती मिळेल, असे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्याप्रमाणे आपण काम करत आहोत.

हेही वाचा >>> कल्याणमधील आधारवाडी तुरुंगाला बेकायदा बांधकामांचा विळखा; दोन वर्षापासून तुरुंग प्रशासनाची पालिकेकडे बांधकामे तोडण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वसाहतीमधील रहिवाशांनी स्वत:हून नियोजन करुन आपला सन्मान केला ही खूप समाधानाची बाब आहे, असे खासदार शिंदे म्हणाले. या भागात कामे आणि कर्तृत्व न दाखविता टीका करणारे काही आहेत. पाच वर्षात कधी लोकांची कामे करणे जमले नाही. लोकांशी कधी संवाद साधला नाही आणि आता त्यांना कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. याला मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणतात. स्वप्ने प्रत्येकाने बघावित आणि मोठे व्हावे. पण आपले कर्तृत्व काय, आपण बोलतो काय याचे भान ठेऊन आपल्या नावापुढे आजीच्या ऐवजी माजी शब्द लागणार नाही ना, याची काळजी कल्याण लोकसभेची स्वप्ने पाहणाऱ्यांनी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आमदार पाटील यांचे नाव न घेता त्यांना दिला. एक हजार कोटीहून अधिकचा निधी आणून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ परिसरात कामे सुरू केली आहेत. या कामांमुळे आपले मतदान वाढेल हा विचार कधीच केला नाही तर या भागातील लोकांची गैरसोय दूर करण्याचा एक प्रयत्न केला. तो यशस्वी झाला आहे. या कामांमध्ये येथील काही मंडळींनी सतत कामे निकृष्ट, काँक्रीट रस्त्यांमुळे घरात पाणी घुसले अशा वावटळी उठवल्या. बोलून आणि ट्वीटवर लिहून काही होत नाही. लोकांच्या मनात उतरण्यासाठी लोकांची विकास कामे करावी लागतात, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला. आम्ही कोणाचीही रेष कमी करत नाही. आमची रेष काम, कर्तृत्वाने वाढवून मोठे होण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.