डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौका जवळील शिवसेना मध्यवर्ति शाखेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याचे अनावरण गुरूवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. या कालावधीत शिवसेना शाखेसमोर जाहीर कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पूर्व रेल्वे स्थानकाकडून शिळफाटा, एमआयडीसीकडे जाणारा आणि रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना कार्यक्रम ठिकाणचा रस्ता आठ तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या पर्यायी रस्ते मार्गाने प्रवाशांनी जावे, अशी अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी बुधवारी काढली आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मानपाडा रस्त्यावर इंदिरा चौकाजवळ शिवसेनेची मध्यवर्ति शाखा आहे. या शाखेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. या पुतळ्यावर मेघडंबरी आणि पुतळा परिसराचे नुतनीकरणाचे काम शासनाच्या ७५ लाखाच्या निधीतून कल्याण डोंबिवली पालिकेने पूर्ण केले आहे. या पुतळ्यावर मेघडंबरी असावी, अशी खासदार डाॅ. शिंदे यांची संकल्पना होती. त्यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून ७५ लाखाचा निधी या कामासाठी आणला.
गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना शाखेसमोरील शिवरायांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविणे आणि परिसर नुतनीकरणाचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून या मेघडंबरीतील पुतळ्याचे अनावरण गुरूवारी संध्याकाळी करण्यात येत आहे. पुतळ्याच्या समोरील जागेतून मानपाडा रस्ता गेला आहे. कार्यक्रमासाठी अधिक संख्येने शिवसैनिक, विविध संस्था, मंडळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या सूचनेवरून डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून इच्छित स्थळी जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी कार्यक्रम स्थळ भागातील रस्ते गुरूवारी दुपारी दोन ते रात्री १० वेळेत बंद ठेवले आहेत. प्रवाशांनी प्रस्तावित केलेल्या पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे.
बंद रस्ते पर्यायी मार्ग
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील ग्रीन चौक येथून रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा चौक दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ग्रीन चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने ग्रीन चौक येथून मानपाडा रस्ता चिपळूणकर रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून इंदिरा चौकातून, मानपाडा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना इंदिरा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डावे वळण घेऊन पी. पी. चेंबर्स माॅल येथून भगतसिंग रस्त्याने सर्वेश सभागृह मार्गे इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहनांना या रस्ते बंदमधून वगळण्यात आले आहे.