ठाणे – श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था, ठाणे यांच्यावतीने गणेश पूजन तसेच कार्यालय प्रवेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ठाण्यातील पहिली शाखा म्हणुन हे कार्यालय ओळखले जाते. त्यामुळे एका अर्थाने संघाच्या नव्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला प्रांत संघचालक अर्जुन यशवंत तथा बाबा चांदेकर यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम शनिवार , १४ जुन रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ यावेळेत डॉ. मूस मार्ग, नाना – नानी उद्यानासमोर, तलावपाळी, ठाणे(प) येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे गणेश पुजन सायंकाळी ४ वाजता होणार आहे. त्यानंतर कार्यालयाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता प्रांत संघचालक अर्जुन यशवंत तथा बाबा चांदेकर आणि प्रांत कार्यवाह विठ्ठल दुधप्पा कांबळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

ठाण्यात १९२५-३० या कालावधीत श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था या व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली होती. या संस्थेला एक सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित संस्था म्हणून ओळखले जाते. संस्थेच्यावतीने नियमित व्यायाम, भारतीय खेळ, योग साधना, महिला व युवक सशक्तीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

या संस्थेचे मूळ ट्रस्टी आबा घाणेकर हे होते. घाणेकर यांनी भारतीय क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून तरुणांमध्ये व्यायामाची सवय लावली. पुर्वी लहान बैठी वास्तू आणि विस्तीर्ण प्रांगण यापासून या व्यायामशाळेची सुरूवात झाली. तेव्हा कुडाचे शेड आणि वर छप्पर असे व्यायामशाळेचे स्वरूप होते. या शेडमध्ये व्यायामाची आयुधे ठेवण्याकरिता एक खोली होती. तसेच शेडमधील बाकीची जागा वैयक्तिक व्यायामाकरिता वापरली जात असे. मैदानी कार्यक्रम आणि खेळ बाहेरील पटांगणात होत असायचे.

यानंतर या संस्थेने आज आधुनिक सुविधांनी युक्त असे २५ हजार चौरस फूट क्षेत्रफळात चार मजली वास्तु उभारली आहे. नवीन इमारतीमध्ये २५० जणांच्या क्षमतेचे सभागृह तसेच एकूण २२ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. याशिवाय, या इमारतीच्या आवारात पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमात ३२ वृक्षांची लागवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच हे सर्व बांधकाम संघप्रेमी नागरिकांच्या देणगीच्या आधारावर उभारण्यात आले असल्याचे कार्यकारी विश्वस्त महेश जोशी यांनी सांगितले. याच वास्तुचे बांधकाम पुर्ण झाले असून या ठिकाणी गणेश पूजन आणि विधिवत प्रवेश असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.