ठाणे : ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वाहतुक कोंडी आणि पाणी प्रश्नावर ठाण्यात सोमवारी, उद्या ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला आता शरद पवारांच्या पक्षाचेही बळ मिळाले आहे. या मोर्चात आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) देखील पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिकसह महत्त्वाच्या शहरामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरातील मुंबई आणि ठाणे महापालिका महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही महापालिकांवर शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा आली ती ठाणे महापालिकेत. त्यामुळे मुंबई प्रमाणे ठाणे महापालिका देखील शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे.

परंतु आता शिवसेनेची दोन शकले पडली आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून ठाकरे ब्रँडची खिल्ली उडविली जात आहे.

मोर्चा का काढला जातोय?

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. ठाणे महापालिकेवर सोमवारी सायंकाळी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय ठाकरे गट आणि मनसेने घेतला. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असून शहरात वाहतुक कोंडी, पाणी प्रश्न निर्माण झाल्याचा ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. शिंदे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत. त्यातच हा मोर्चा काढला जाणार असल्याने ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आव्हान असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या मोर्चात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले. मोर्चा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथून सुरु होणार असून तो ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. शहरातील नागरी समस्या, ठाणे महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, वाहतुक कोंडी, पाणी प्रश्नामुळे हा मोर्चा काढला जाणार असल्याचे विचारे आणि जाधव यांनी सांगितले होते.

शरद पवारांच्या पक्षाचे बळ

ठाणे महापालिकेत सध्या नगरसेवक नाहीत. मात्र, राज्य सरकार पालिका चालवित आहे. अशा स्थितीत खाबूगिरी वाढली आहे. माॅडेल रोड, इतर रस्ते, उद्याने आदींची टेंडर काढून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असा आरोप मनोज प्रधान यांनी केला. दुसरीकडे पाण्याची समस्या तीव्र आहे, रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याची समस्या तीव्र झाली आहे. या विरोधात काढण्यात येणारा हा मोर्चा म्हणजे जनतेचा आक्रोश असणार आहे, असे मनोज प्रधान म्हणाले. दरम्यान, हा मोर्चा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथून सुरु होणार असून तो ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात ठाणे, कोपरी – पांचपाखाडी, ओवळा- माजिवडा, कळवा- मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असे प्रधान यांनी सांगितले.