ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्सचा संसर्ग थांबविण्याकरिता तसेच एचआयव्ही आणि एड्स मुक्त पिढी जन्माला यावी, याकरिता एक जागरुक नागरीक व जागरुक मंडळ या नात्याने प्रयत्न करणे आपली सर्वांची सांघिक जबाबदारी आहे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सर्व गणेश मंडळांनी ए़ड्स आजारासंबंधीचे जनजागृतीपर फलक लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांनी उभारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यातील बहुतांश मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले जातात. तसेच अनेक मंडळ आपल्या देखाव्याचे छायाचित्र तसेच सविस्तर माहिती देणारे ध्वनीचित्रफीत आणि रिल विविध समाज माध्यमांवरून प्रसारित करत असतात. यामुळे या मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे उपयुक्त ठरते. हेही वाचा : भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदार मिळेना, बदलापुरात पालिकेकडून निविदेला मुदतवाढ, भटके श्वान वाढले याच पार्श्वभूमीवर एचआयव्ही, एड्स मुक्त पिढी याबाबत जनजागृती करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी स्वखर्चाने फलक लावावेत. तसेच या विषयाच्या प्रसिध्दीसाठी केलेल्या मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी मंडळांनी एड्सबाबत जनजागृतीपर प्रदर्शित केलेल्या फलकाचे दोन छायाचित्र dpothane@mahasacs.org आणि dsthane@mahasacs.org या ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.