ठाणे – ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षात जाहीर केलेल्या ८१ अनधिकृत शाळांपैकी ६१ शाळा या एकट्या दिवा परिसरातील असून या शाळा बंद करण्यासाठी कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी १ जुलैपासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळाचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. असे असले तरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाणे महापालिकेक़डून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते. मात्र, त्या शाळा बंद करण्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. यामुळेच या शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याची आकडेवारीच संघटनेने मांडली.
ठाणे महापालिकेने २०२३ मध्ये ४७ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. त्यात ३० शाळा दिव्यातील होत्या. २०२४ मध्ये पालिकेने जाहीर केलेल्या यादीत ७५ शाळा अनधिकृत होत्या आणि त्यात दिव्यातील ६१ शाळांचा समावेश होता. यंदाच्या वर्षी म्हणजेच पालिकेने २०२५ मध्ये ८१ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात दिव्यातील ६१ शाळांचा समावेश आहे. त्यात यंदाच्या जून महिन्यात दिव्यात आणखी ८ अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या बेकायदा शाळा बंद करण्याची मागणी गेली चार वर्षांपासून शिक्षण विभागाकडे करत आहोत. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. या बेकायदा शाळेत पात्र नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बेकायदा शाळांमुळे पालकांची तसेच समाजाची दिशाभुल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी दिव्यातील सर्व अधिकृत शाळा १ जुलै पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यात, लहान शिशू ते इयत्ता नववी चे वर्ग बंद राहणार आहेत. तर, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.