Thane News / ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मिरा भाईंदर महपालिकेकडून केले जात आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप शिल्लक असून ही कामे १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत केली जाणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांना पुन्हा भिवंडी-काल्हेर, मुंबई नाशिक महामार्ग, चिंचोटी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला. त्याचा परिणाम या मार्गांवर होणार आहे. मागील आठवड्यात सुट्ट्यांच्या दिवसांत हजारो वाहने रस्त्यावर आली होती. आता पुन्हा एकदा गायमुख घाट रस्त्याचे काम केले जाणार असल्याने मोठ्या कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
ठाणे, वसई, विरार, मिरा भाईंदर, गुजरात, बोरीवली, दहिसर येथे वाहतुक करणाऱ्या वाहन चालक, नोकरदारांसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा आहे. तसेच गुजरात व वसई परिसरातून उरणमधील जेएनपीए बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहतूक प्रामुख्याने याच मार्गावरून वाहतुक करतात. परंतु पावसाळ्यात गायमुख घाटात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील वाहने भिवंडी-काल्हेर, मुंबई नाशिक महामार्ग, चिंचोटी पर्यायी मार्गावरून वाहतुक करु लागली. वाहनांचा भार आल्याने या सर्व मार्गावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसांत प्रवाशांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. या रस्त्याची दुरुस्ती झाली असून मार्गावर डांबरिकरण केले जाणार आहे. त्यासाठी १५ ऑगस्ट रात्री १२.०१ वाजता ते १८ ऑगस्टला पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहे. सलग सुट्ट्यांचे दिवस असल्याने नागरिक मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता असून कोंडीची भिती व्यक्त केली जात आहे.
वाहतुक बदल असे आहेत.
- मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने खारेगाव टोलनाका मार्गे मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील, किंवा कापूरबावडी जंक्शन येथून कशेळी-काल्हेर मार्गे अंजुरफाटा येथून वाहतुक करतील.
- मुंब्रा बाह्यवळण येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.- नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.
- गुजरात येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने चिंचोटी नाका, कामण, अंजुरफाटा, मानकोली मार्गे वाहतुक करतील.