ठाणे : कापूरबावडी येथील चौकात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या कामामुळे शनिवारी दुपारी येथील चौकातील उड्डाणपूलावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यामुळे माजिवाडा ते मिनाताई ठाकरे चौका पर्यंत आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे दुपारी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. पावसामुळे कोंडीत भर पडली होती.
घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणारी हजारो हलकी आणि अवजड वाहने ठाणे, भिवंडीहून कापूरबावडी चौक मार्गे वाहतुक करतात. गेल्याकाही दिवसांपासून या चौकात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कापूरबावडी चौकातील लहान आकाराचा पूल दुपारी १२ वाजता वाहतुकीसाठी बंद केला होता.
त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. कापूरबावडी ते गोकुळनगर, मिनाताई ठाकरे चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक, कोर्टनाका परिसरातून घोडबंदर, कोलशेत, ढोकाळी, वसंत विहार, माजिवडा येथे वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अवघ्या पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यास अर्धा ते पाऊण तास लागत होता. दुपारी २ नंतर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु त्यानंतरही कोंडी कायम होती.
या वाहतुक कोंडीचा परिणाम पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुक व्यवस्थेवर झाला. या मार्गावर कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गे मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.
वाहनांचा भार वाढल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचेही हाल झाले. या मार्गावरही माजिवडा, कापूरबावडी भागात कोंडी झाली होती. खराब रस्ते आणि पावसामुळे कोंडीत भर पडली.