ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अवजड वाहनांना गणेशोत्सवाच्या कालावधीत दिवसा बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवात अवजड वाहने केवळ रात्री आणि पहाटे प्रवेश करु शकतात. तसेच विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या दिवशी विसर्जन मिरवणूका संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू असेल. या संदर्भाची अधिसूचना ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी काढली आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. उरण येथील जेएनपीए बंदरातून सुटणारी अवजड वाहने गुजरात किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी ठाणे, भिवंडी शहरातून प्रवेश करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते सायंकाळी ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत प्रवेश करण्यास मुभा आहे.
अवजड वाहनांमुळे ठाणे, भिवंडी शहरात दररोज वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा परिणाम घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, कशेळी काल्हेर, शिळफाटा या मार्गावर होत आहे. त्यामुळे मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्याची सूचना केली होती. मंगळवारी रात्री अवजड वाहतुकीसंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत अवजड वाहनांना दिवसा बंदी लागू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांना रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ यावेळेत वाहतुक करू शकतात. तर गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी लागू असेल.