ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातील कोपरी भागात असलेल्या ठाणेकर वाडी परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नवी शाखा खुली झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सक्रिय झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते राजन विचारे यांच्या हस्ते रविवारी या शाखेेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगल्याचे चित्र होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यासह ठाण्यातील बहुतेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले होते. तर, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याचे दिसून आले होते. त्यावेळी शाखा कुणाच्या मालकीच्या यावरुन देखील दोन्ही गटात मोठा वाद रंगल्याचे चित्र होते.
शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट अनेकदा आमने-सामने आल्याचे प्रकार देखील घडले होते. शिंदे गटाने आनंद आश्रम परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करत आनंद आश्रमावर ताबा मिळवला होता. त्यानंतर, शहरातील शाखांकडे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा वळवित काही शाखा स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. परंतू, ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच चंदनवाडी येथील शाखेवर ताबा मिळविण्यास शिंदे गटाला अपयश आले होते. ठाणे शहरात ठाकरे गटाच्या मालकीच्या अवघ्या काही शाखांच राहिल्या होत्या. परंतू, ठाकरे गटाने या शाखांमधूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे या निवडणुकांच्या काळातही शाखांचा विषय चांगलाच रंगल्याचे चित्र होते. आता, महापालिका निवडणुकांकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले असून त्यांनी आपापल्या स्तरावर निवडणुकांची तय़ारी सुुरु केली आहे.
विविध पक्षांकडून सामाजिक उपक्रम, नविन शाखा तसेच कार्यालयांचे उद्घाटन असे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अशाचप्रकारे रविवारी ठाण्यातील कोपरी भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कोपरी भागात शिवसेना (उबाठा) पक्षाची नवी शाखा म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात ठाकरे गटाने केलेले एकप्रकारचे शक्ती प्रदर्शन असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे