ठाणे : राज्यातील अनेक भागात यंदाच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीने शेकडो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. घर संसारासह शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर यांसारखे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. अशा कठीण प्रसंगी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, शालेय गळती टाळावी या उद्देशाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने ‘विद्या -ज्योती’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येणार आहे.वर्षानुवर्षे सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाई अनुभवलेल्या मराठवाड्यावर यंदा अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट आले आहे. मराठवाड्यातील – धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना आणि सोलापूरसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे नद्यांना महापूर आला असून, अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे.

पुरामुळे शेतांमध्ये चिखल झाला असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती आणि जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच घर संसारासह शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर यांसारखे शैक्षणिक साहित्य देखील वाहून गेले आहे. त्यामुळे ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मोफत पुरवले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येणार आहे. यात वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर, लेखन साहित्य यांचा समावेश असलेले “शैक्षणिक साहित्य संच” प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. याशिवाय, स्थानिक पातळीवरील गरजेनुसार अन्य शालेय वस्तू देखील पुरवल्या जातील. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

समाजाचा सहभाग

या योजनेसाठी समाजातील प्रत्येक नागरिकाला हातभार लावता यावा म्हणून एका विद्यार्थ्यासाठी रु. ३,०००/- एवढा निधी संकलित करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा निधी टीजेएसबी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून गोळा केला जाणार आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून हे अभियान सुरू होऊन २८ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीपर्यंत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत पुरविण्यात येईल.

प्रकल्पाचा उद्देश

या प्रकल्पाचा उद्देश रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे डॉ. विनय सहस्रबुद्धे, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल आणि सेवा सहयोगचे अतुल नागरस यांनी स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, “पूरामुळे कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. साहित्य नष्ट झाल्यामुळे शाळा सोडण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे लोकसहभागातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.”