ठाणे : ठाण्यात बेदरकारपणे वाहने चालविणे, वाहतुक नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडणार आहे. ठाणे पोलिसांनी अत्याधुनिक प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेरे विविध १२ चौकात बसविले असून अवघ्या १० दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार हून अधिक वाहन चालकांविरोधात ई-चलानद्वारे कारवाई झाली आहे. त्यामुळे चुकूनही तुम्ही वाहतुक नियमाचे उल्लंघन करुन सीसीटीव्हीच्या नजरेत आलात तर थेट ई-चलान कापले म्हणून समजा. काही दिवसांत ठाणे आयुक्लायात ३५० कॅमेरे बसविले जातील असे ठाणे वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले.

ठाणे वाहतुक पोलिसांची हद्द ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात वाहतुक पोलिसांकडून ई-चलान यंत्राद्वारे पोलिसांकडूनच रस्त्यावर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या वाहनाचे छायाचित्र काढून कारवाई केली जाते. मुंबईत सीसीटीव्हीच्या साहाय्याने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होती. मुंबई प्रमाणे ठाण्यात ही व्यवस्था कार्यान्वित नव्हती. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही कारवाई पुरेशी होत नव्हती. कारवाई दरम्यान अनेकदा वाहन चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. हे प्रकरण हाणामारी, शिवीगाळ पर्यंत गेल्याचे देखील समोर आले होते.

एआय आधारीत प्रणाली – ठाणे पोलिसांनी आता यावर तोडगा म्हणून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रणाली लागू केली आहे. ही यंत्रणा १ सप्टेंबरपासून कार्यान्वित झाली असून पहिल्याच १० दिवसांत तीन हजारांहून अधिक ई-चलन जारी करण्यात आल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले.

ही एआय-आधारित प्रमाणाली २४ तास कार्यान्वित असून, हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांद्वारे सिग्नलवरील थांब रेषा ओलांडणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, तिघे बसून दुचाकी चालवणे, मार्गिका नियमाचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे वाहतुक उल्लंघन आपोआप कॅमेऱ्यात टिपले जात आहेत. नोंद झालेली माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षात पाठवली जाते, तेथे ती प्रक्रिया करून वाहन मालकाशी जोडली जाते आणि त्यानंतर चलन जारी केले जाते.

प्रथम टप्प्यात १२ अत्याधुनिक कॅमेरे महत्त्वाच्या चौकांवर बसवले आहेत. त्यात कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, माजीवाडा, कापुरबावडी, आनंदनगर, ओवळा, अंजनूर फाटा, कल्याण नाका आणि दिघे चौकाचा समावेश आहे. लवकरच ३५० कॅमेऱ्यांपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रणालीमुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात होणारे वाद कमी होतील. कॅमेऱ्यातील पुराव्यामुळे नियमांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होईल व जागेवर वादाची शक्यता कमी होईल असा दावा पोलिसांनी केला.
गुन्हे रोखण्यासही मदत

‘आयटीएमएस’च्या मदतीने वाहतूक कोंडीवरही लक्ष ठेवता येणार आहे. दीर्घकालीन वाहतूक नियोजनालाही मदत होणार आहे. ही प्रमाणाली सुरु झाल्याने चोरी किंवा इतर गुन्हेगारी रोखण्यासही मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.