बदलापूरः यंदाच्या मे महिन्यात सुरूवातीला पश्चिम विक्षोभ आणि त्यानंतर आलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे कधी नव्हे ते विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या भागात शासकीय हवामान केंद्र नाही. मात्र खासगी हवामान अभ्यासकांनी केलेल्या नोंदीनुसार गेल्या अनेक दशकांनंतर मे महिन्यात अशा पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वाधिक ४९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुरबाडचे धसई, उल्हासनगर येथेही सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हास नदीला पूर येतो. त्या माथेरान, कर्जत आणि कळंब भागातही सरासरी ५०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या मे महिन्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. ऐरवी धामांच्या धारात निघणारा मे महिना पावसाच्या धारांत गेला. काही ठिकाणी या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. नालेसफाईपासून विविध कामांचे पितळ उघडे पडले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबईच्या नव्या मेट्रो मार्गिकेलाच गळती लागली. विजेचा पुरवठा अनेक ठिकाणी खंडीत झाला. उन्हाळी पिकांना याचा मोठा फटका बसला. ठाणे जिल्ह्यातील आंबा शेवटच्या टप्प्यात हाती आलाच नाही. मात्र हा पूर्व मोसमी पाऊस वळव्याच्या पावसापेक्षा अधिकचा होता.
यंदाच्या वर्षात पश्चिमी विक्षोभाचा मोठा फटका महाराष्ट्राला आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याला बसला. पश्चिमी विक्षोभानंतर पूर्व मोसमी पावसाचाही तितकाच फटका बसला. संपूर्ण मे महिना हा पाऊस कोसळला. त्यामुळे कधी नव्हे ते विक्रमी पावसाची नोंद मे महिन्यात झाली. बदलापूर शहरात ऐरवी अधिक पाऊस पडत असतो. मे महिन्यातही हीच परंपरा कायम राहिली. बदलापूर शहरात संपूर्ण मे महिन्यात ४९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बदलापुरनंतर नेरूळ ३३७, मुरबाड तालुक्यातील धसई ३००, उल्हासनगर ३१२, अंबरनाथ २८९, मुरबाड २७१, कल्याण २६८, ठाणे २५५, कोपरखैरणे २५३, टिटवाळा २४६, ऐरोली २४०, डोंबिवली २३४, भिवंडी २२२, दिवा २१४ आणि शहापूर येथे १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
विशिष्ट ठिकाणीच अधिकचा पाऊस
सुरूवातीला पश्चिमी विक्षोभ आणि नंतर पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी यात सातत्य दिसले नाही. काही एखाद्या शहरात दिवसाला २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी शेजारच्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील शहरात अवघा ५० मिलीमीटर पाऊस पडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे बदलापुरसारख्या शहरात ४९६ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी शेजारच्या अंबरनाथमध्ये अवघा २८९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
शेजारच्या रायगडमध्येही जोरदार पाऊस
ठाणे जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीला रायगड जिल्ह्यातील पावसामुळे पूर येतो. त्या रायगड जिल्ह्यातही मोठा पाऊस झाला. रायगडमधील सर्वाधिक पाऊस मुरूड मध्ये झाला. येथे तब्बल ८२४ मिलीमीटर पाऊस पडला. नेरळजवळील कळंब येथे ५८९ मिलीमीटर पाऊस पडला. तर माथेरान येथे ५५१, कर्जत येथे ३७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच ठिकाणच्या पावसाचे पाणी थेट उल्हास नदीत मिसळते.