ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ७ मे रोजी युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर कल्याण येथील रामबाग लेन परिसरातील मॅक्सी मैदानात दुपारी ४ वाजता थरारक पद्धतीने मॉक ड्रिल पार पडले. यामध्ये पोलीस, अग्निशमन दल, नागरी सुरक्षा, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य आणि महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी युद्धजन्य परिस्थिती उदभवल्यास काय करावे, याबाबत विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले होते. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश होता बुधवारी एकाचवेळी हे मॉक ड्रिल्स पार पडले. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. या मोहिमेला केंद्र सरकारकडून “ऑपरेशन अभ्यास ” असे नाव देण्यात आले होते. कल्याण येथील मॅक्सी मैदानात बुधवारी दुपारी ४ वाजता हे मॉक ड्रिल घेण्यात आले.

यावेळी मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात एकूण ४ सायरन एकाच वेळी वाजवण्यात आले. तर मैदान शेजारील इमारतीवर बॉम्बहल्ला झाल्याच्या सूचना सर्व सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना देण्यात आल्या. यानंतर तातडीने पोलीस पोलीस, अग्निशमन दल, नागरी सुरक्षा, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी हल्लास्थळी बचावासाठी आले. यानंतर जखमी झालेल्या नागरिकांना मदत करणे, रुग्णवाहिकेत पोहचविणे, तात्पुरती मलमपट्टी करणे, इमारतींमधून बाहेर काढणे. यांसारखी अनेक बचावाची प्रात्यक्षिके यावेळी सर्व विभागांनी सादर केली.

बघ्यांवर पावसाचा स्ट्राईक

यावेळी मैदान परिसरात अनेक नागरिकांनी हे मॉकड्रील पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे पोलिसांना ही गर्दी आवरण्याचे देखील एक आवाहन होते. मात्र ऐनवेळी पाऊस आल्याने मॉक ड्रिल पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी नजीकच्या इमारतींचा आसरा घेत पावसापासून बचाव केला. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील यावेळी पावसापासून स्वतःचा बचाव करताना दिसून आले.