बदलापूर : बदलापुरात असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत या क्रीडा संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट, धावपट्टी, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव यांच्यासह प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही असणार आहे. जून २०२३ मध्ये या क्रीडा संकुलाची पडझड झाली होती. भितींसह संपूर्ण छत कोसळल्याने येथे खेळाडूंना सराव करता येत नव्हता.

एकीकडे अंबरनाथ सारख्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटीं रेंज असताना आणि त्यातून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे विद्यार्थी तयार होत असताना दोन्ही शहरातील क्रीडा संकुलांचा विकास मात्र रखडला आहे. अंबरनाथ पालिकेच्या क्रीडा संकुलाचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बदलापूर शहरात असलेल्या अंबरनाथ तालुक्या क्रीडा संकुल हा खेळांडूंसाठी एकमेव पर्याय होता. मात्र जून २०२३ मध्ये पावसात या क्रीडा संकुलाची भिंत कोसळली होती. भिंत कोसळल्यानंतर त्याचे छप्परही जमिनदोस्त झाले होते. या घटनेत क्रीडा संकुलाचे मोठे नुकसान झाले. तसेच खेळाडूंचा येथील खेळही बंद झाला. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच याची उभारणी करण्यात आली होती. सुदैवाने क्रीडा संकूल बंद असताना भींत कोसळली.

गेल्या दोन वर्षांपासून या क्रीडा संकुलाची दुरावस्था जैसे थे आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका संयुक्त बैठकीनंतर क्रीडा संकुलाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली निघण्याची आशा आहे. मंत्रालयात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसिलदार यांच्यासह एक बैठक झाली. या बैठकीत तालुका क्रीडा संकूल पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे २५ कोटी रूपये खर्चातून हे संकूल उभारले जाईल. त्यात विविध खेळांचा समावेश करण्यात आला असून नव्याने जलतरण तलावही उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही उभारली जाणार आहे. तालुका क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे यांनी ही माहिती दिली.

लवकरच मान्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालुका क्रीडा संकुलात बंदिस्त खेळांचा सर्वाधिक समावेश असले. यात बॅडमिंटन, धावपट्टी, जलतरण तलाव यांचा समावेश असेल. टेनिस कोर्टही उभारले जाणार आहे. राज्य क्रीडा विभाग यावर काम करत असून लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजूर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे खेळाडूंची क्रीडा संकुलाची प्रतिक्षा संपण्याची आशा आहे.