कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात तीन पिस्तुल आणि आठ जीवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या तीन परप्रांतीय इसमांना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि पथकाने शनिवारी पहाटे अटक केली. ते दिल्ली, उत्तरप्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
गणेशोत्सव, ईद सण शांततेत पार पडण्यासाठी या सणांच्या काळात अवैध शस्त्र विक्री, अंमली पदार्थांची तस्करी, इतर अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या पोलिसांना सूचना आहेत. त्यामुळे पोलीस पथके स्थानिक पातळीवर गस्त आणि नजर ठेऊन आहेत. अशाच हालचालींवर नजर ठेवत असताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांना कल्याण रेल्वे स्थानक भागात शनिवारी पहाटे तीन जण पिस्तुल आणि जीवंत काडतुसे विक्रीसाठी करण्यासाठी तीन तरूण येणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.
खंडणी विरोधी पथकाने उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक साळवी, उपनिरीक्षक सचिन कुंभार यांच्या पुढाकाराने कल्याण रेल्वे स्थानक भागात शनिवारी मध्यरात्री सापळा लावला. साध्या वेशातील पोलीस या भागात गस्त घालत होते. पहाटेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक भागात तीन इसम बराच उशीर एकाच जागी घुटमळत होते. त्यांच्या जवळ पिशव्या होत्या. ते रेल्वे स्थानकात प्रवासी म्हणून जात नाहीत. रिक्षेतून कोठे जात नाहीत. त्यामुळे हेच ते पिस्तुल विक्री करणारे इसम असावेत असा खंडणी विरोधी पथकातील पोलिसांना संशय आला.
वरिष्ठ निरीक्षक साळवी यांनी साध्या वेशातील एका हवालदाराला त्या तीन जणांच्या दिशेने जाण्यास सांगितले. हवालदाराने त्या तिघांना तुम्ही येथे काय करता. कुठे जायचे आहे, असे प्रश्न केले. त्यावेळी ते गोंधळले आणि समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. हवालदाराने इशारा करताच गस्तीवरील पथकाने या तिघांना घेरले.
अक्षय साहनी (२०, उत्तरप्रदेश), बिंदु गौर (२६, उत्तरप्रदेश), आकाश वर्मा (२३, सेंट्रल दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामधील अक्षय हा शिक्षण घेत आहे. पोलिसांनी या तिघांची झडती घेतली. त्यांच्या जवळील पिशवीत तीन पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे आढळून आली. घातक शस्त्रे बाळगण्यास, विक्री करण्यास प्रतिबंध असताना या तिघांनी त्याचे उल्लंघन केले म्हणून पथकाने त्यांना अटक केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या तिघांनी ही पिस्तुल कोठून आणली. ते ती कोणाला विक्री करणार होते याचा तपास उपनिरीक्षक सुभाष तावडे करत आहेत.
या कारवाईमध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, उपनिरीक्षक सचिन कुंभार, सुभाष तावडे, हवालदार शैलेश शिंदे, आशिष ठाकुर, राजाराम पाटील, संजय राठोड, अभिजीत गायकवाड, सुमित मधाळे, सचिन जाधव, भगवान हिवरे, रवींद्र हासे, शितल पावसकर, सतिश सपकाळे, विनोद ढाकणे, तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ सहभागी झाले होते.