Pushpak Express and Local Train Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर या घटनेत पाच जण जखमी झाले आहे. जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका गंभीर होता की, रेल्वे रुळांवर जखमी पडून होते.

कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने रेल्वेगाडी निघाली होती. कसारा भागात रेल्वेगाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सकाळी रेल्वेगाडीत मोठ्याप्रमाणात गर्दी असते. रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता, एक एक्स्प्रेसगाडी समोरून आली. एक्स्प्रेसची गाडी उपनगरीय रेल्वेगाडीतून दारात लटकलेले प्रवाशांना घासली गेली. त्यामुळे एकामागून एक असे आठ प्रवासी रेल्वेगाडीतून खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच, मुंब्रा रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळांवर रक्त सांडले होते. अपघातानंतर प्रवाशांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघात दोन ते तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.