कल्याण- कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे दोन विकासक संस्थांकडून एका विकासक संस्थेला ठरलेल्या नोंदणी कराराप्रमाणे बांधकामाचा ठरलेला मोबदला न देता फसवणूक केली. याशिवाय कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने इमारत १२ माळ्याची उभारण्यास परवानगी दिली होती. तरीही विकासकांनी सहा वाढीव बेकायदा माळे बांधले. त्या बेकायदा बांधकामाला महारेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवून पालिका, महारेराची फसवणूक केली. यामुळे एका विकासकाने याप्रकरणी पाच विकासकांच्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>> फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करुन डोंबिवलीतील व्यावसायिकाची फसवणूक; आरोपी महिलेला गोव्यातून अटक

मे. चौधरी डेव्हलपर्सचे भागीदार शशिकांत चौधरी, जयश्री चौधरी, शक्ती रिएल्टीचे भागीदार कपील पटेल, जनक पटेल आणि वास्तुविशारद जाॅन वर्गिस अशी गुन्हा दाखल विकासकांची नावे आहेत. नेस्ट इंडिया बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स संस्थेचे भागीदार, विकासक जहिर अहमद अब्दुल हमीद कुरेशी (६६, रा. कल्याण) या प्रकरणात तक्रारदार आहेत.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार विकासक कुरेशी यांनी काही वर्षापूर्वी गौरीपाडा येथील जमीन विकसित करण्यासाठी घेतली होती. या जमिनीवर काही कारणांमुळे इमारत ते बांधू शकले नाहीत. त्यांनी ही जमीन विकसित करण्यासाठी चौधरी डेव्हलपर्सला दिली. त्यानंतर चौधरी आणि शक्ती रिएल्टी संस्थेने इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. दोन्ही विकासकांनी तक्रारदार कुरेशी यांना बांधिव इमारतीत वाहनतळ, भरपाई देण्याचे कबुल केले होते. ठरल्याप्रमाणे चौधरी आणि शक्ती विकासकांनी शब्द पाळला नाही. कुरेशी यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्याची दखल घेण्यात आली नाही.

हेही वाचा >>> ठाणे : वागळे इस्टेटमधून हद्दपार आरोपीस अटक

इमारत बांधण्यासाठी नगररचना विभागाने १२ माळ्यांना परवानगी दिली, त्यावर मे २०२१ ते नोव्हेंबर २०२१ कालावधीत वाढीव सहा माळे चौधऱी, शक्ती विकासकांनी कसे बांधले याची माहिती नगररचना विभागातून कुरेशी यांनी घेतली. नगररचना विभागाने २० माळ्याला परवानगी नसल्याचे लेखी कळविले. महारेराकडून विकासकांनी १७ माळ्याला परवानगी असल्याचे दाखवून रेरा नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते. सदर वाढीव बांधकाम तोडून टाकावे म्हणून कुरेशी यांनी पालिकेत पाठपुरावा केला. त्याची दखल तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, आयुक्त भाऊसाहेब दांगडे, नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक दीशा सावंत यांनी घेतली नाही. चौधऱी, पटेल विकासकांकडून सदनिका खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता होती. पालिका अधिकारी वाढीव सहा बेकायदा माळ्यांवर कारवाई करत नसल्याने तक्रारदार कुरेशी यांनी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी शक्ती आणि चौधरी विकासक आणि त्यांच्या वास्तुविशारदांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका अधिकारी कसे बेकायदा बांधकामांची पाठराखण करतात याचे उदाहरण यानिमित्ताने पुढे आले आहे. अशाच पध्दतीने डोंबिवलीतील ६५ इमारतींचा बेकायदा घोटाळा घडला आहे. याप्रकरणातील वास्तुविशारदावर कारवाई करण्याची मागणी कल्याण डोंबिवली वास्तुविशारद संघटनेकडून राष्ट्रीय वास्तुविशारद संघटनेकडे करण्यात येणार आहे, असे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.