उल्हासनगरः उल्हास नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने विशेष यंत्रे मागवून जलपर्णी हटवली. मात्र ही जलपर्णी नदीच्या काठावरच टाकली जात होती. त्यामुळे ती पुन्हा नदीत जाण्याची शक्यता होती. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिल्यानंतर अखेर ठाणे जिल्हा परिषदेने या जलपर्णीची जबाबदारी घेतली आहे. नियोजनाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही जलपर्णी सुकवली जाते आहे. त्यापासून वस्तू निर्मिती करून त्यातून महिला बचत गटांना रोजगार देण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे.

उल्हास नदीतील प्रदुषणामुळे नदी पात्रात जलपर्णी निर्माण झाली आहे. ती काढावी यासाठी पर्यावरणप्रेमी, नागरिकांकडून सातत्याने आंदोलने केली गेली. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, विविध महापालिकांचे आयुक्त, अधिकारी यांची संयक्त बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्या बैठकीत उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यंत्रे उपलब्ध करून जलपर्णी काढेल असे स्पष्ट केले होते.

त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयाला ही यंत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. या यंत्राच्या माध्यमातून जलपर्णी हटवण्यात आली. मात्र ही जलपर्णी काढून नदीच्या किनाऱ्यावर टाकण्यात आली होती. जलपर्णी हटवण्याच्या निर्णयासोबतच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या जलपर्णीचा वापर गृहोपयोगी वस्तू निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार निर्माण करून दिला जाणार होता. मात्र हे काम रखडले गोते. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिल्यानंतर अखेर जिल्हा परिषदेने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उल्हास नदीकिनारच्या वरप, कांबा या भागातील महिला बचत गटांच्या मदतीने जलपर्णी सुकवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महिलांना हे काम देत असतानाच त्याचे प्रशिक्षणही द्यावे लागणार आहे. प्रशिक्षणातही जलपर्णीची आवश्यकता होती. आता ही जलपर्णी उपलब्ध झाल्याने लवकरच प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी जवळपास २१ दिवसांचा आहे. तोपर्यंत वस्तू निर्मितीसाठी जलपर्णीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्याचवेळी जलपर्णी सुकवण्याचे कामही सुरू राहणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्याची आशा आहे.