Thane Rain / ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तसेच गरब्यावर पावसाचे सावट आहे.

भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ७२ तास महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकण विभागासाठी रेड अलर्ट दिला होता. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसून येत असून सकाळपासून शहरात पाऊस सुरू आहे. वि‍जांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे.

काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक, रेल्वे गाड्यांची वेळापत्रके आणि सार्वजनिक वाहतूक यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कमी वाहने रस्त्यावर आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत दिसून येत आहे.

गरब्यावर पावसाचे सावट

नवरात्रोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांवर पावसाचे सावट पसरले आहे. पहिल्याच दिवशी पावसामुळे गरबा खेळण्यात व्यत्यय आला होता. सामान्यतः दररोज रात्री १० वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी असते, अनेकांना कामावरून घरी येऊन रात्री दहा वाजेच्या आत गरबा करणे शक्य होत नव्हते. मात्र पोलिसांनी शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंतची विशेष मुभा दिली होती. अनेकांनी कामावरून परतल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह गरब्याचा आनंद घेण्याचे नियोजन केले होते.

काही ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी सजावट, संगीत, पारितोषिकांची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे या नियोजनावर विरजण पडले असून अनेक ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे.