ठाणे – येथील खोपट भागात सोमवारी दुपारी एका घरावर वृक्षाची फांदी कोसळल्याने दोघांना दुखापत झाली. मोनिका जाधव (३५) तसेच त्यांचा मुलगा अद्वैत जाधव(०३) अशी दुखापत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. कोसळलेल्या वृक्षाची फांदी बाजूला करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
खोपट येथील आंबेडकर रोड परिसरात जाधव निवास चाळ आहे. सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास येथील मोनिका जाधव यांच्या घरावर वृक्षाची फांदी कोसळली. त्यावेळी घरामध्ये मोनिका जाधव आणि त्यांचा मुलगा अद्वैत हे दोघे होते. त्यांना या घटनेत दुखापत झाली. यात मोनिका यांच्या खांद्याला मार लागला आहे. तर, अद्वैत याच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेत घराचे पत्रे देखील तुटल्याने नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वृक्षाची फांदी कापून बाजूला केली.