डोंबिवली – येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील सेवन स्टार ऑर्केस्ट्रा बारमध्ये मंगळवारी रात्री दारू पित असताना दोन ग्राहकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन गोळीबारात होऊन एक तरूण ग्राहक गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे.
विकास भंडारी असे गोळीबारात गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजय सिंग असे गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी सांगितले, सेवन स्टार आर्केस्ट्रामध्ये मंगळवारी रात्री जखमी विकास भंडारी, आरोपी अजय सिंग आपल्या मित्रांसोबत स्वतंत्र मंचावर दारू पित बसले होते. सिंग आणि भंडारी यांच्या खुर्च्या एकमेकाला लागून होत्या. दोन्ही गटातील मेजवान्या रंगात आल्या होत्या.
यावेळी सिंग आणि भंडारी मित्रांशी बोलत असताना त्यांची खुर्ची एकमेकांना घासली. खुर्ची मुद्दाम घासण्यात आली असा संशय व्यक्त करून भंडारी, सिंग यांच्यात बाचाबाची झाली. दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रागाच्या भरात अजय सिंग याने जवळील रिव्हॉलव्हर काढून भंडारी याच्या दिशेने गोळी झाडली. ती त्याच्या खांद्याला लागली. यावेळी बारमध्ये गोंधळ निर्माण झाला. ग्राहकांची पळापळ झाली.
या घटनेनंतर अजय सिंग आणि त्याचे मित्र बार मधून पळून गेले. जखमी विकासला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे घटनास्थळी आले. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तातडीने तपास पथक तयार करून भंडारीवर गोळीबार करणारा सिंग यांच्यासह त्याच्या साथीदारांना डोंबिवली परिसरातून अटक केली. त्यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरण : ‘या’ कारणामुळे अटकेत असलेल्या वकिलाकडून सरकारी वकिलाला मारहाण
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील वाढते बेकायदा बार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी याप्रकरणी कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.