महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड.. रत्नागिरीजवळ असलेल्या खेड तालुक्याच्या परिसरातले हे तीन किल्ले. एकाच वेळी दमछाक करणारी आणि ताजंतवानं करणारी त्यांची भटकंती..

रत्नागिरीजवळ असलेल्या खेडच्या ईशान्येला अंदाजे २० किमी अंतरावर, सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेला एक समांतर मोठी डोंगररांग आहे. याच रांगेवर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे सुंदर दुर्गत्रिकुट वसलेले आहेत. सलग डोंगरधारेवरून दोन-तीन दिवसांच्या डोंगरयात्रेत या तिन्ही दुर्गाचे दर्शन घेण्यात आणि त्या पायपिटीतच खरी मजा आहे. झेनोश पटेल या जातिवंत मुरलेल्या भटक्या मित्राबरोबर या ट्रेकसाठी जायचं ठरलं.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
buldhana, bear, three cubs, temple, dongarshewali village,chikhali tehsil, viral video,
VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….
kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात वीकेंडला जोडून सुट्टी मिळवली. ठरल्याप्रमाणे शनिवारी पहाटेच झेनोश आणि मी (दोघेच) त्याच्या गाडीतून खेडच्या दिशेने निघालो. अकरा वाजेच्या सुमारास खेडला पोहोचलो. तिकडेच झेनोशच्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये गाडी ठेवली. इथून पुढचा प्रवास एसटीने आणि पायगाडीनेच घडणार होता.

बसचा प्रवास करून वाडी जैतापूर गावात उतरलो. ‘वाडी जैतापूर’ हे महिपतगडाच्या पायथ्याचे एक गाव. भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चढाई सुरू केली. या वाटेने वर जाऊन गडाच्या घेऱ्यात असलेल्या वाडी बेलदार या गावी आजचा मुक्काम करून, दुसऱ्या दिवशी महिपतगडावर मुक्काम, तिसऱ्या दिवशी सुमारगड पाहून सायंकाळी रसाळगड पोहोचणे, चौथ्या दिवशी गड पाहून मुंबईला परत, असे नियोजन होते.

गावातून महिपतगडाच्या दिशेला पाहिल्यावर डाव्या हाताला मोठी डोंगरसोंड उतरली आहे, त्याच वाटेने चढाईला सुरुवात होते. हल्लीच वाडी बेलदार व पुढे गडाच्या मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार पुढच्या वर्षांपर्यंत गडावर रस्ता होणार. मनात लगेच विचार आला, गडावरची पवित्रता, शांतता भंग पावणार, पिकनिक छाप मंडळींची गर्दी वाढणार कचरा होणार. वाट सुरुवातीला रस्त्याने जाऊन, सोडेंवरून चढून वरच्या टप्प्यातील धनगर वस्तीत पोहोचलो. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा मुख्य सोडेंवरून चढाई सुरू केली. पूर्ण वाटेवर विजेच्या तारांची सोबत होतीच, तीच वीज वाडी बेलदार आणि गडावरच्या मंदिरात नेली आहे. हळूहळू चढ तीव्र होत गेला.

पुढे अध्र्यावर वाट मुख्य सोडेंवरून आडवी आतल्या बाजूला वळून दुसऱ्या सोडेंवरून चढू लागली. मध्येच येणारी वाऱ्याची एखादी झुळूक सुखावून जात होती. शेवटचा चढाईचा टप्पा पार करून, उजव्या हाताचे छोटे टेकाड चढून आल्यावर पलीकडच्या बाजूला वाडी बेलदारमधली घरे दिसली. गावात पोहोचल्यावर समोरच्या घरात विचारपूस झाली, लागलीच चहापण मिळाला.

सीताराम विठ्ठल जाधव हे त्या घरातल्या आजोबांचे नाव. त्यांच्याच अंगणात आमचा बाडबिस्तरा मांडून टाकला. शेजारच्या जिजाबाई आजीकडे रात्रीचे जेवण केले. दुसऱ्या दिवशी सीताराम आजोबांना घेऊन महिपतगडाकडे निघालो. सुरुवातीला उभ्या दांडावरची चढण पार केल्यावर बुरूज दिसला. डावीकडे वळून बुरुजावर गेलो. खाली वाडी बेलदार गाव आणि आम्ही काल वर आलो ती वाट दिसली.

बुरूज पाहून आल्या वाटेने पुन्हा वर चढू लागलो. वाटेत विहीर व पुढे पाणी अडवण्यासाठी जुनी बंधाराची िभत दिसली. आणखी वर गेल्यावर डाव्या बाजूने दहिवलीतून गडावर येणारी वाट या वाटेला मिळाली. झाडीभरल्या गडाच्या वाटेवरून पुढे जात उजवीकडच्या वाटेला वळालो. थोडे पुढे गेल्यावर जुने अवशेष दिसले. तसेच आणखी पुढे गेल्यावर मारुती व गणपतीचे जुने मंदिर होते. पुन्हा माघारी फिरून मुख्य वाटेला लागलो. थोडे अंतर चालल्यावर हे झोलाई देवीचे ठाणे दिसले. त्या अलीकडेच गडावरचे मुख्य पारेश्वर महादेव मंदिर आहे.

मंदिरात वीज होतीच. आम्ही आमच्या अवजड पाठपिशव्या मंदिरात ठेवून दिल्या. सीताराम आजोबांसोबत गडफेरीसाठी निघालो. दाट जंगलातून वाट काढत उत्तरेला कोतवाल दरवाजाच्या मार्गात आलो. दरवाजाचे अवशेष शोधणे महाकठीण काम. फक्त खालची व बाजूची दगडांची रचाई आणि वाटेतला झाडीभरला बुरूज नजरेस पडतो.

थोडे पुढे गेल्यावर खाली दूरवर कोतवाल गाव आणि ईशान्येला प्रतापगड दिसला, तर पूर्वेला सह्य़ाद्रीतल्या मुख्य रांगेतला मकरंदगड सहज ओळखता आला. त्याच झाडीभरल्या मधल्या वाटेने पूर्वेकडे वर चढून गेलो. इथूनच पुसाटी दरवाजाची वाट जाते. परत आल्या वाटेने उजव्या बाजूने फिरून मंदिरात आलो. नंतर मंदिरासमोरील उजव्या बाजूने आग्नेय दिशेला मुख्य वाटेने यशवंत बुरुजाकडे निघालो. हीच वाट पुढे वळसा घालून पलीकडे वडगावात उतरते. समोर सह्य़ाद्रीची अजस्र रांग न्याहाळत बसलो.

एव्हाना सूर्य डोक्यावर आला. पुन्हा माघारी मंदिरात आलो. सीताराम आजोबांना निरोप दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे ते आम्हाला राया धनगराच्या झापापर्यंत सोबत येणार होते.

गडावर आता आम्ही दोघेच होतो. विहिरीच्या गार पाण्याने अंघोळ करून फ्रेश झाल्यावर दुपारचे जेवण केले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुन्हा भटकायला निघालो, मंदिराच्या मागील टेकडीवर जायचे होते, वाटेत एके ठिकाणी भरपूर फुलपाखरे दिसली. टेकडीवर जाण्यासाठी वाट अशी नाहीच, कसा तरी मार्ग काढत वर जाण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेला सायंकाळच्या सूर्यप्रकाशात सुमारगडाचा माथा चांगलाच उठून दिसत होता.

दाट जंगल व भयंकर गचपण वाट वर न जाताच, उजवीकडे वळून एका पायवाटेला लागली. बहुतेक पोलादपूरच्या दिशेला पुसाटी बुरुजाच्या दिशेने एक वाट जाते, ही तीच वाट असावी. त्या वाटेने जंगलातले चढ-उताराचे एक एक टप्पे पार करत बरेच अंतर चालत गेलो. सूर्यास्त होत आला होता, वेळेअभावी पुन्हा माघारी फिरून मंदिरात आलो.

रात्रीचे जेवण झाल्यावर मंदिरासमोरच्या अंगणात आकाशातले चमचमणारे तारे पाहत बसलो. थंडीचा कडाका वाढू लागला, आत जाऊन लवकरच झोपी गेलो.

सकाळी ठरल्याप्रमाणेच भल्या पहाटे उठलो. कारण आजचा पल्ला लांबचा होता. आमच्या जीपीएसनुसार पारेश्वर महादेव मंदिर ते झोलाईदेवी मंदिर रसाळगड हे क्रो फ्लाय अंतरच ८ किमीच्या आसपास होते. झटपट पोहे तयार केले. पूर्वेला नुकतेच उजाडत होते. सर्व सामान आवरून सात वाजण्याच्या सुमारास मंदिरातून खाली वाडी बेलदारच्या दिशेने निघालो.

उतरताना डावीकडे सुमारगडाचा उंच माथा नजेरत भरला. रसाळगड तर पार त्याच्यामागच्या डोंगररांगेत हरवला होता. ही पूर्ण डोंगरवाट पार करायची आहे हे, मनाला आणि शरीराला बजावून सांगितले. अर्धा पाऊण तासात सीताराम आजोबांच्या घरी पोहचलो.

त्यांच्यासोबत आठ वाजता बेलदारहून निघून समोरच्या दांडाने सुमारगडाच्या दिशेने समोरचे उंच टेकाड चढून चाळीस मिनिटांत राया धनगरांच्या झापावर पोहचलो. पूर्वेला महिपतगडाचा यशवंती बुरूज खासच दिसत होता. इथेच आम्ही सीताराम आजोबांचा निरोप घेतला.

सुमारगडाच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर वाट डावीकडून वळसा घेत पुन्हा वर चढू लागली, बऱ्यापकी जंगल त्यामुळेच वातावरणात चांगलाच गारवा होता. पाऊण तासाच्या सलग चालीनंतर सुमारगडाच्या अलीकडे डोंगराखाली असलेल्या अरुंद अशा गुर िखडीत पोहचलो. इथून सरळ जाणारी वाट सुमारगडाला डावीकडे ठेवून सरळ रसाळगडाला जाते. िखडीतून डावीकडे सुमारगडाची चढाई सुरू केली. मध्ये वाटेत अवजड पाठपिशव्या ठेवून, फक्त पाण्याची बाटली, थोडा सुका खाऊ आणि सोबत रोप घेऊन पुढे निघालो.  गवताळ आणि मुरमाड घसाऱ्याच्या वाटेने तिरके वर चढत छोटय़ा पठारावर आलो. समोरच सुमारगडाचे दर्शन झाले. तर पाठीमागे आमचा कालचा सोबती महिपतगड.

इथून पुन्हा गडाच्या दिशेने अरुंद सोंडेने चढाई सुरू केली. दाट झाडीतल्या आडव्या वाटेने गडाच्या जवळ जाऊ लागलो. अत्यंत बारीक, अडचणीतल्या, दरीकाठच्या वाटेने कातळमाथाला डावीकडून वळसा घेत पुढे गेलो. ही आडवी (ट्रेव्हर्सी) अडचणीतली वाट अत्यंत सावकाश आणि शांतपणे पार केली. वाटेत दोन ठिकाणी भुयारासारखे कातळात आतल्या बाजूला पाण्याचे टाके आहेत. तसेच आस्तेकदम पुढे जात, सुमारगडाच्या ५०-६० फूट उंचीच्या प्रसिद्ध कातळकडय़ाजवळ पोहचलो. तिथे हल्लीच गावकऱ्यांनी दोन छोटय़ा शिडय़ा ठेवल्या आहेत आणि माथ्यावर असलेल्या झाडाला एक केबल वायर बांधून सोडली आहे. अगदी व्यवस्थित होल्ड घेत सावकाश वर पोहचलोसुद्धा. वर गेल्यावर समोरच हे देवाचं ठाण दिसले. काही जुन्या मूर्ती ठेवल्या आहेत. आतमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. थोडे पुढे पिण्याच्या पाण्याचे टाके, सोबतचा सुका खाऊ खाऊन पुन्हा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

टाकाच्या डावीकडून वळसा घालून माथ्यावर टेकाड चढून गेलो. कुणीतरी आधीच माथ्यावरचे गवत जाळून टाकलेले होते. गडाचा माथा नावाप्रमाणेच सुमार आहे, पण नजारा बाकी अफलातून. उत्तरेला महिपतगड आणि आम्ही आलो तो गुरिखडीचा मार्ग, पूर्वेला सह्य़ा शिरोधारेवरचे मकरंदगड, पर्वत, चकदेव उठावले होते. वेळेचे भान ठेवून निघालो. पुन्हा सावकाशपणे कातळकडा उतरायला सुरुवात केली. उतरताना समोर दरी असल्याने थोडे दृष्टिभय होतेच, पण शांतपणे तो टप्पा पार झाला.

पुन्हा ती अरुंद आडवी वाट पार करून मोकळ्या डोंगरसोंडेवर आलो. पुन्हा एकदा मागे वळून पाहिले, दुर्गम अशा सुमारगड जाऊन आल्याचे समाधान वाटले. आल्यामाग्रे घसाऱ्याची वाट उतरून गुरिखडीत पोहोचेपर्यंत दुपारचा एक वाजला होता. थोडक्यात, वाडी बेलदारहून निघून सुमारगड पाहून परत येण्यासाठी आम्हाला पाच तास लागले होते.

थोडी विश्रांती घेऊन पुढच्या मार्गाला लागलो, वाट पुन्हा उजव्या बाजूने दाट झाडीत शिरली. काही ठिकाणी तर खूपच गचपण अक्षरश: खाली वाकून जावे लागत होते, तरी राया कोयत्याने बाजूला सारत होते. थोडय़ा अंतराने वाट छोटय़ा मोकळ्या पठारावर आली, सुमारगड आता आमच्या उत्तरेला पाठीमागे होता. इथूनसुद्धा एक वाट सरळ सोंडेवरून चढून उजवीकडे वळसा घेऊन सुमारगडाच्या कातळकडय़ाखाली जाते, पण फार वापरात नसलेली ही वाट धोकादायक आहे.

पुढे काही पावलांवर देवीची जुनी मूर्ती दिसली. वाघोबा देवी असे नाव रायांनी सांगितले. आता वाट डावीकडून वळसा घेत पुढे सरकू लागली. तासाभराच्या चालीनंतर उजवीकडे एका ओढय़ाजवळ छोटा पाणवठा दिसला. मग काय तिथेच सोबत असलेले संत्रे, काकडी, बॉइल अंडी, गुळ चिक्की खाऊन, पाणी भरून निघालो. आता वाट जंगलातून मोकळ्या पठारावर आली. पुढे उतरत उजवीकडे वळसा घेत, घोणेमाळ वर आलो. इथे एक धनगरवाडा आहे.

थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर पहिल्यांदा रसाळगडाचे दर्शन झाले.

एव्हाना साडेचार वाजत आले होते, आता रायांना निरोप देण्याची वेळ आली होती. रायांनी आम्हाला पुढची वाट समजावून सांगितली.

क्षणभर मनात विचार आला, खरंच किती मोठय़ा मनाची ही माणसं, परत अंधार पडायच्या आत त्यांच्या धनगरवाडय़ाावर पोहोचतील का? पायात जुनी स्लीपर घालून हा माणूस न कचरता घसरडय़ा गवतावरून, मुरुमावरून सहज जातो. खरंच ही माणसे म्हणजे जंगलाचे राजेच म्हणावे. झेनोशने त्याच्या जवळचा नवीन टॉर्च रायांना दिला.

रसाळगड जरी समोर दिसत असला तरी आम्हाला मधली िखड उतरून पलीकडच्या टेकडीला वळसा घालून जायचे होते. वाट उतरायला लागली. पुन्हा ते सुकलेले घसरडे गवत, हळूहळू खिंडीत उतरून डावीकडून वाट पुन्हा पलीकडे उजव्या बाजूला उतरली. आणखी थोडे उतरून आम्ही एका पठारावर आलो. मळलेल्या वाटेने अध्र्या तासात तांबडवाडी- घेरा रसाळगड या गडासमोरच्या गावात पोहोचलो.

तिथे फार वेळ न थांबता छोटय़ा सोंडेवरून छोटी चढाई करून रसाळगडाच्या पहिल्या दरवाजासमोर आलो. खाली उजव्या हाताला निमणी गाव आणि वर आलेला गाडीरस्ता, तर डाव्या बाजूला रसाळवाडी. पाच मिनिटांत गडाचा पहिला दरवाजा गाठला. मागे वळून पाहता विश्वासच बसत नव्हता एवढय़ा दुरून जंगलातले चढ-उतार पार करत, डोंगर पायपीट करून ठरविलेले लक्ष्य गाठले होते. दुसरा दरवाजा पार करून सरळ झोलाई देवीच्या मंदिरात गेलो तेव्हा साडेपाच वाजून गेले होते. पुन्हा जीपीएसवर चेक केले, तर क्रो फ्लाय अंतर ८.४ किमी आणि पारेश्वर मंदिर ते झोलाई देवी मंदिर हे अंतर १७ किमी आहे.

सामान मंदिरात ठेवून लगेच गडदर्शनासाठी निघालो. मंदिरासमोरच भली मोठी दीपमाळ लक्ष वेधून घेते. अलीकडेच तोफ दिसली. मंदिर खूपच प्रशस्त असून विजेची सोय आहे. मंदिराच्या पाठीमागे तलाव आणि एक छोटे शिवमंदिर आहे. तलावाच्या मागच्या बुरुजावर पुनर्बाधणीचे काम केल्यासारखे दिसले.

सायंकाळच्या सूर्यप्रकाशात पर्वत आणि चकदेव खूपच सुंदर दिसत होते. सूर्यास्त मंदिराच्या पाठीमागच्या कट्टय़ावरून पाहिला. संधिप्रकाशात गडावरचे वातावरण खूपच खास होते. चांगल्या भटकंतीचा शेवट रमणीय रसाळगडावर.. क्या बात है!
योगेश अहिरे – response.lokprabha@expressindia.com