वाहन परवाना म्हणजेच लायसन्स काढण्यासाठी आधी शिकाऊ परवाना काढावा लागतो. यासाठी एक चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये वाहतुकीच्या नियमांसंदर्भात प्रश्न विचारले जातात. या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शिकावू परवाना देण्यात येतो. मात्र इंग्लंडमधील एक व्यक्ती या चाचणीमध्ये चक्क १५७ वेळा नापास झाली आहे. अखेर या व्यक्तीला १५८ व्या वेळा परीक्षा दिल्यानंतर यश मिळालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या शिकावू परवान्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याच्या नादात या व्यक्तीने तब्बल तीन हजार पौंड म्हणजेच तीन लाख रुपये खर्च केले. आता ही व्यक्ती पहिली चाचणी म्हणजेच थेअरीची परीक्षा उत्तीर्ण झाली असली तरी ती प्रॅक्टीकल म्हणजेच प्रत्यक्ष गाडी चालवताना काय करेल असा प्रश्न सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
ब्रिटनमधील ड्रायव्हिंग अॅण्ड व्हेइकल स्टॅण्डर्ड्स एजन्सीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात शिकावू परवान्यासाठी सर्वाधिक वेळा अर्ज करणाऱ्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर एक तिशीच्या वयातील महिला आहे. या महिलेने आतापर्यंत ११७ वेळा परीक्षा दिली असून ती अद्याप उत्तीर्ण झालेली नाही. तिसऱ्या क्रमांकावर असणारी महिला ही ४८ वर्षांची असून ही महिला नुकतीच ही परीक्षा उत्तीर्ण झालीय. ९३ वेळा नापास झाल्यानंतर ९४ व्या प्रयत्नात ही महिला उत्तीर्ण झाली.
प्रत्यक्ष गाडी चालवण्याच्या चाचण्यासंदर्भातील आकडेवारीही या अङवालातून समोर आली असून या यादीमध्ये एक ७२ वर्षीय आजोबा पहिल्या स्थानी आहेत. ४३ प्रयत्नानंतर या आजोबांना गाडी चालवण्याचा परवाना देण्यात आला आहे. तर अन्य एका ४७ वर्षीय महिलेने आतापर्यंत गाडी चालवण्याची परीक्षा ४१ वेळा दिली असून ती अद्यापही उत्तीर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळेच ४१ प्रयत्नानंतरही या महिलेला परवाना देण्यात आलेला नाही.
एवढ्या वेळा प्रयत्न कराव्या लागणाऱ्या व्यक्तींना परवाना देताच कामा नये असं मत असणारे अनेकजण असतील. मात्र सिलेक्ट कार लिझिंग निर्देश असणाऱ्या मार्क टॉग्यू यांचे मत यासंदर्भात थोडं वेगळं आहे. लॅडबायबलशी बोलताना मार्क यांनी, “ती एक म्हण आहे ना तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. ड्रायइव्हींग टेस्टमध्ये उत्तीर्ण होणं हे आयुष्यातील सर्वात गोंधळात टाकणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. अनेकांना यामध्ये एकाहून अधिक वेळा प्रयत्न करावे लागू शकतात,” असं सांगतात. “मात्र परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला नाही तरी निराश न होता पुन्हा परीक्षा देणं गरजेचं आहे मग ती तुम्ही दुसऱ्यांदा द्या किंवा १५७ वेळा द्या. कोणीही पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुढे येत असेल तर ते खरोखरच कौतुकस्पद आहे,” असंही मार्क सांगतात.