वर्ष 2020 च्या स्वच्छता सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेल्या मध्य प्रदेशच्या इंदोरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदोरमधील एका सार्वजनिक सुलभ शौचालयात चक्क अंडे आणि मटणाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

इंदोरमध्ये सध्या स्वच्छता सर्वेक्षण-2021 ची तयारी सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी विविध क्षेत्रांमध्ये फिरुन साफसफाई आणि अन्य व्यवस्थेची पाहणी करतायेत. महानगरपालिकेची एक टीम शहरातील सुलभ शौचालयात तपासणी करण्यास गेली असता काही शौचालयांमध्ये कुटुंब राहत असल्याचं समोर आलं, तर बुधवारी एका शौचालयात चक्क अंडे आणि मटण विक्रीसाठी ठेवल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे शौचालयाच्या केअरटेकरनेच शौचालयात अंडे आणि मटणाचं दुकान लावलं होतं. त्यानंतर त्या केअरटेकरला जागेवरच एक हजार रुपयांचा दंड आकारला अशी माहिती महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभय राजनगांवकर यांनी दिली, तसेच सुलभ शौचालय चालवणाऱ्या संस्थेलाही 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं राजनगांवकर यांनी सांगितलं.


केंद्र सरकारच्या वर्ष 2017, 2018, 2019 आणि 2020 च्या स्वच्छता सर्वेक्षणात इंदोर शहर देशात अव्वल ठरलं होतं. आता आगामी 2021 च्या सर्वेक्षणातही ही परंपरा कायम राखण्याचा इंदोरचा प्रयत्न असून महानगरपालिकेने “इंदौर लगाएगा स्वच्छता का पंच” असा नारा दिला आहे.